'संगीताचा आत्मा कायम ठेवून नावीन्य आणणे अवघड'

'संगीताचा आत्मा कायम ठेवून नावीन्य आणणे अवघड'

पुणे - ‘‘संगीताचा आत्मा कायम ठेवून त्यात नावीन्य आणण्याचा प्रयोग हे संगीतातील सर्वांत अवघड वळण आहे. बडे गुलामअली खाँ, किशोरीताई यांनी ‘लक्ष्मण रेषा’ ओलांडत संगीतातील हे नावीन्य सातत्याने निर्माण केले. त्यामुळेच ते जगद्‌मान्य झाले,’’ अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांनी संगीत क्षेत्राबद्दलची आपली भावना रविवारी (ता.२५) व्यक्त केली.

‘पु. ल. परिवार’ आणि ‘आशय सांस्कृतिक’च्या वतीने आयोजित ‘पुलोत्सवात’ झाकिर हुसेन यांना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘पु. ल. स्मृती सन्मान’ प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी झाकिर हुसेन यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी कला क्षेत्रातील विविध मुद्‌द्‌यांवर भाष्य करत झाकिर हुसेन यांनी वैयक्तिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला. व्यासपीठावर आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार तसेच नयनीश देशपांडे, कृष्णकुमार गोयल, नितीन ढेपे, आर पत्की, टोनी, प्रा. रमेश गंगोली, मयूर वैद्य उपस्थित होते. 

 नवनिर्मितीचे लेणे
झाकिर हुसेन म्हणाले, ‘‘प्रयोगशील असणारा आणि नावीन्य निर्माण करणारा कलाकार नेहमीच इतरांपेक्षा वेगळा ठरतो. संगीताच्या मूळ गाभ्याला, परंपरेला धक्का न लावता सादरीकरण करणे, हे कठीण असते. पुस्तकी ज्ञान आणि व्यासपीठावरील प्रत्यक्ष वादन, या दोन्हींमुळे अनुभवसंपन्नता येत असते. आतापर्यंत असे अनेक तबलावादक होऊन गेले की, जे प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत; मात्र, त्यांनी त्यांच्या तबलावादनात आणलेल्या प्रयोगशीलता आणि नावीन्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक गाणी अजरामर झाली.

 साथसंगत करतो तो तबला 
झाकिर हुसेन म्हणाले, ‘‘तबलावादकाचे कौशल्य हे एकल वादनात नसते, तर तो गायक किंवा अन्य वादकांना कशी साथसंगत करतो, यावर असते. कुमारजींना वसंतराव आचरेकर यांनी तबल्यावर साथसंगत केली, त्यामुळे कुमारजींचे गायन अधिक खुलले. त्यांना अन्य दुसऱ्या तबलावादकाने साथसंगत केली असती तर त्यांचे गाणे हे वेगळ्या स्तरावरचे झाले असते.’’

गुरूच्या पुढे गेले पाहिजे
आपण गुरूकडून कला आत्मसात करतो, तेव्हा आपले वादन त्या गुरूच्या वादनाप्रमाणे न होता, आपण गुरूच्या पुढची पायरी गाठणे आवश्‍यक असते. तसे झाले नाही, तर कलेमध्ये साचलेपणा येतो. शिष्याने गुरूच्या पुढे जाण्यातच संगीत क्षेत्राची समृद्धी असते, असेही मत झाकिर हुसेन यांनी व्यक्त केले.

राजदत्त म्हणाले...
आपल्यातच रमतो तो अवलिया; पण जो आपल्या कलेत जीव ओतून श्‍वास घेत असतो, जगत असतो, जगात वावरत असतो, व्यवहार करत असतो आणि तरीही आपल्या कलेत संपूर्ण समरस होऊन जगत असतो, अशांना मी अवलिया म्हणतो. अशा अवलियाचा माझ्या हस्ते सत्कार होत आहे; पण शब्द जरी सत्कार असला तरीही माझ्या मनामध्ये मी पूजा करतो, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली. ताल, लय यांनी सुरांना केवळ संगतच दिली नाही, तर त्यातील शब्दांना आपल्या हृदयांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. त्यांना कुर्निसात करतो, अशा शब्दांत राजदत्त यांनी झाकिर हुसेन यांचा गौरव केला. त्यांचे पाय जमिनीवर दिसतात. त्यांच्या पायांना मी स्पर्श करतो; पण त्यांचा चेहरा मला आकाशात दिसतो. ही उंची ज्या माणसाने गाठली असा हा अवलिया म्हणजे झाकिर हुसेन...
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com