जगताप आत्महत्येप्रकरणी  पाच जणांना पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

पुणे - जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी समर्थ पोलिसांनी सोमवारी पाच जणांना अटक केली असून, गुन्ह्यातील दोघे अद्याप फरारी असल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. 

पुणे - जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी समर्थ पोलिसांनी सोमवारी पाच जणांना अटक केली असून, गुन्ह्यातील दोघे अद्याप फरारी असल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. 

विनोद रमेश भोळे (वय 34, रा. घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रेय सुतार (वय 30, रा. कोथरूड), अमित उत्तम तनपुरे (वय 28, रा. मांजरी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय 36, रा. येरवडा) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय 30, रा. येरवडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता सात जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात ऍड. सुधीर शहा आणि ऍड. पुष्कर दुर्गे यांनी बाजू मांडली. 

याप्रकरणी जयेश जगताप (वय 23, रा. घोरपडे पेठ) याने फिर्याद दिली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, जयेश याचे वडील जितेंद्र जगताप यांनी शनिवारी दुपारी घोरपडी येथे रेल्वेखाली आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक दीपक मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्यासह अन्य लोकांची नावे देत आत्महत्येस जबाबदार असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार लोहमार्ग पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपासासाठी हा गुन्हा समर्थ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. 

समर्थ पोलिस ठाण्यासमोरील रास्ता पेठ येथील जमिनीचा ताबा देण्यासाठी संगनमत करून धमकावणे आणि मानसिक तणावाखाली आणून जगताप यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून सोमवारी सकाळी समर्थ पोलिसांनी पाच जणांना अटक केली. यापैकी काही जण मानकर यांच्याकडे काम करीत असल्याची माहिती समोर येत आहे. खडक पोलिस तपास करीत आहेत. 

Web Title: Jagtap suicide case: Five accused in police custody