जय भवानीनगरमध्ये भरते समांतर शाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

पौड रस्ता - शाळेत जायची इच्छा होती; परंतु घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे शिकता येत नव्हते. काम करून शिकायची मनाची तयारी होती; पण शाळेचा आणि कामाचा वेळ जुळत नव्हता. अशातच आमच्या जय भवानीनगरमध्ये सुरू असलेल्या समांतर शाळेचे नाव कानावर आले आणि आमच्या अंधारलेल्या जगात प्रकाशाचे किरण दिसू लागले. हे बोल आहेत नववीतून शाळा सोडाव्या लागणाऱ्या बाबासाहेब मगर यांचे. आता त्यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण करून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाजवळ हॉटेल उभारले आहे.

जय भवानीनगर परिसरात आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट शाळा सोडावी लागणाऱ्या १९ वयोगटापुढील महिला व पुरुषांना अराईस विश्व संस्थेच्या समांतर युवा केंद्राअंतर्गत दहावी व बारावीत शालाबाह्य प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमाची सुरवात संस्थेचे अध्यक्ष आशुतोष कांबळे यांनी २०१५ मध्ये केली. त्यांच्या या कार्यात पत्नी पूर्वा या मदत करत आहेत.  

कांबळे हे जय भवानीनगरमध्ये राहतात. त्यांनी राहत्या घरात ही शाळा सुरू केली आहे. उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक सुविधा, करिअर मार्गदर्शन, ग्रंथालय, कौशल्य विकास प्रशिक्षण या सुविधा दिल्या जातात. धुणीभांडी वा मोल मजुरीची कामे करणाऱ्या महिलांना खेळणी बनविणे, टेडी बेअर बनविणे याचे प्रशिक्षण दिले जाते. 

महिलांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री करून मिळालेल्या रकमेचा गरजू मुलांच्या शिक्षणासाठी वापर केला जातो. यामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होत आहे. तसेच त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होत आहे. हा उपक्रम चार शाळाबाह्य मुलांना घेऊन सुरू करण्यात आला. आजपर्यंत याचा लाभ २७७ जणांनी घेतला आहे.

माझे गाव मुळशी आहे. शिक्षणासाठी मला माले गावी जावे लागायचे. शाळेतून घरी येण्यासाठी रात्री उशीर व्हायचा. त्यामुळे सातवीनंतर शाळा सोडावी लागली. मी मावशीकडे जयभवानीनगर येथे आले. त्या वेळी अराईस विश्व संस्था शालाबाह्य मुलांचा सर्व्हे करत होती. इथे मी बाहेरून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. आता मी पौडगावात शाळेतील मुलांना शिकवते.
- ऋतुजा धुमाळ, शिक्षिका

महाविद्यालयात असताना एनएसएससारख्या उपक्रमातून आम्हाला प्रेरणा मिळाली. कोथरूडमध्ये गुन्हेगारी वाढली, अशा बातम्या वृत्तपत्रांतून वाचायचो. त्यामुळे या भागात काम करण्याचे ठरवले. शालाबाह्य मुलांना, महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे काम करतो.   
- आशुतोष कांबळे, अध्यक्ष, अराईस विश्व संस्था

Web Title: Jaibhavaninagar Toys Training School for Woman