कारागृहांच्या भिंतींआड मधाचा गोडवा

मंगेश कोळपकर
रविवार, 13 जानेवारी 2019

पुणे - कारागृहांच्या भिंतींपलीकडे कायमच कटू अनुभव असतात. मात्र, यापुढे राज्यातील कारागृहांतून मधाच्या अवीट गोडीचा अनुभव बंदिवान देणार आहेत. हो... बंदिवान आता मधमाश्‍यापालनातून उत्पादित मध राज्यभर विकणार आहेत. त्यासाठी कारागृह प्रशासनाने येरवडा कारागृहातील प्रयोग यशस्वी झाल्यावर राज्यातील १९ कारागृहांतून हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. पुण्यातील केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्राचे साह्य लाभणार आहे. 

शिक्षा पूर्ण झाल्यावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी कारागृहातील बंद्यांना शेती किंवा विविध उद्योग, व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येते. आता त्यात मधमाश्‍यापालनाचीही भर पडणार आहे. गेल्या वर्षी गांधी जयंतीच्या दिवशी खादी ग्रामोद्योग मंडळाने मधमाश्‍यापालनासाठी दहा पेट्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाला प्रयोगासाठी दिल्या होत्या. 

त्यातील नऊ पेट्यांमधून मध उत्पादन किंवा शेतीसाठी त्यांचा वापर करण्याचा प्रयोग सध्या यशस्वीपणे सुरू आहे. या प्रयोगामुळे प्रशासनाला हुरूप आला. त्यांनी राज्यातील सर्व कारागृहांत हा प्रयोग राबविण्याचे ठरविले. त्यासाठी खादी-ग्रामोद्योग मंडळानेही सहकार्याचा हात पुढे केला आणि मोफत प्रशिक्षण वर्ग देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार पुणे, कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा, विसापूर, पैठण, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, रत्नागिरी, आटपाडी आदी कारागृहांतील विविध पदांवरील २६ कर्मचाऱ्यांना शहरातील केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्रात ३१ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमासाठी प्रशासनाकडून विकास अधिकारी सुनील पोकरे तर, कारागृह विभागाकडून तंत्र अधिकारी संजय फडतरे यांनी पुढाकार घेतला. या अभिनव प्रयोगासाठी केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्राने पाठबळ दिले आहे.

५४ कारागृहांत योजना
मधमाश्‍यापालनातून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी कारागृह प्रशासनाने उचललेल्या पावलांमुळे राज्यातील ५४ कारागृहांमध्ये ही याेजना राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ कारागृह असतील. येथील कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

मधमाश्‍यापालन करून त्यातून उत्पादकता वाढविणे, हे कारागृहांच्या बंद भिंतीआड यशस्वी होऊ शकते. राज्यातील १९ कारागृहांत पहिल्या टप्प्यात हा उपक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे. 
- विठ्ठल जाधव, विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य कारागृह

Web Title: Jail Accused Honey Production