‘जलसंचयनी’तून पाणीटंचाईवर मात (व्हिडिओ)

Water
Water

पुणे - पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच आता टेरेसवर पाणी साठवून त्यातून तब्बल तीन ते चार महिने पाणीबचत करता येणार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळांमधून मुक्ती होईल. ‘गो ग्रीन टेक्‍नॉलॉजी’ वापरून आपल्याला हा प्रयोग राबविता येईल.

‘जलसंचयनी’ असे या उपक्रमाचे नाव असून, त्यासाठी फक्त पाच ते दहा हजार रुपये खर्च आहे.  पुण्यातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मधुसूदन कुंभारे यांनी हा तोडगा काढला आहे.

काय आहे जलसंचयनी?
जलसंचयनी म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पुढचे पाऊल. पूर्वी गच्चीवर साचलेले पाणी जमिनीतील टॅंकमध्ये अथवा जमिनीत जिरविण्यात येत होते. त्यानंतर खालील टाकीमधून पंपाच्या साह्याने ते गच्चीवरील टाकीत सोडण्यात येत होते.

मात्र, जलसंचयनीमध्ये टेरेसवर ५०० मायक्रॉनचा प्लॅस्टिकचा कागद अंथरावा लागतो. त्यातून जमा होणारे पाणी टेरेसवर असलेल्या टाकीत टाकून तेच पाणी आपल्या घरात अंघोळ, स्वच्छतागृह, भांडी धुण्यासह इतर कारणांसाठी वापरता येते. त्याचप्रमाणे टेरेसवर पाण्याची टाकी बसविल्यास त्यात पडणारे पावसाचे पाणी १०० टक्के शुद्ध असते. त्याचा वापर पिण्यासाठीही करू शकतो. अथवा प्युरिफायच्या माध्यमातून प्लॅस्टिकच्या कागदावर साचलेले पाणीही आपण पिऊ शकतो.

काय फायदा होणार? 
    पावसाळ्यात महापालिकेचे पाणी घेण्याची गरज राहणार नाही. 
    पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेला करावा लागणारा विजेचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल. हाच खर्च सोसायटीचाही वाचेल.
    मेट्रोपॉलिटन शहरात हा प्रयोग केल्यास रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होईल. परिणामी, गटारी तुंबून होणारी आपत्ती टळेल.
    धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम होणार नाही. त्याचा फायदा शेतीला पाणी देण्यासाठी होईल.

उदाहरण १ 
पुणे महापालिकेच्या इमारतीचे टॉप टेरेस सुमारे ५० हजार स्क्वेअर फूट आहे. पुण्यात एक हजार स्क्वेअर फुटांवर पावसाच्या प्रमाणानुसार एका सीझनमध्ये ८० हजार लिटर पाणी साचते. ५० हजार स्क्वेअर फुटांवर चार लाख लिटर पाणी साठू शकते. याच पाण्याचा महापालिकेने वापर केल्यास पाण्यासह विजेचीही बचत होईल. 

उदाहरण २  
पुण्यातील मगरपट्टा सिटी ही ६०० एकरांवर वसली आहे. यात २० टक्के म्हणजेच १२० एकरांवर बांधकाम आहे. अर्थातच ५२ लाख २७ हजार २०० स्क्वेअर फुटांवर बांधकाम आहे. येथे जलसंचयनीचा प्रयोग केल्यास एका सीझनमध्ये ४१ कोटी ८१ लाख ७६ हजार लिटर पाणी जमा होईल. प्रत्येक दिवशी पाण्याचे कलेक्‍शन ४६ लाख ४६ हजार लिटर होईल. प्रत्येक माणसाला प्रतिदिनी १५० लिटर पाणी लागते, असे गृहीत धरल्यास मगरपट्टा सिटीमध्ये प्रत्येक दिवशी ३० हजार ९७६ लोकांना हे पाणी पुरू शकेल. 

जमिनीतून पाण्याचा उपसा झाल्याने दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ‘जलसंचयनी’चा प्रयोग केल्यास पाण्यासह वीज, पैशांची बचत होईल. मगरपट्टा, महापालिका, आयटी पार्क, मार्केट यार्ड , सोसायट्यांमध्ये हा प्रयोग केल्यास त्यांचा खर्च वाचेल. हा उपक्रम देशात राबविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे.
- डॉ. मधुसूदन कुंभारे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com