पुणे शहरात आता ‘जलयुक्त’ अभियान

पुणे शहरात आता ‘जलयुक्त’ अभियान

पुणे - दिवसेंदिवस गंभीर होत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पावसाचे पाणी जमिनीत मुरवून नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित  केले जात आहे. यातून भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. पुणे शहरातदेखील पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आता ‘जलयुक्त शहर’ अभियान राबविणार आहे. यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करणार आहे.

राज्यावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. धरणे, तळे, विहिरी, बोअर कोरडे पडल्याने ग्रामीण भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे. खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. शहरातील विहिरी, रेनवॉटर हार्वेस्टिंगचे पाणी वापरले जात नाही. परिसरात चांगला पाऊस पडतो; पण सिमेंट काँक्रिटीकरण व बांधकामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता नदीत वाहून जाते. हे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरावे आणि त्याचा वापर नागरिकांना करता यावा, यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केला आहे.

महापालिकेच्या बहुतांश इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. यामधून जमा झालेले पाणी शुद्ध करून ते त्या इमारतींमध्ये वापरले जाणार आहे. शहर व उपनगरांतील टेकड्या व मोकळ्या मैदानांमध्ये चर खोदून पावसाचे पाणी अडवून ते जिरवले जाईल. पावसाळ्यापूर्वी हे काम हाती घेतले जाणार आहे; तसेच जुन्या विहिरींमधील गाळ काढण्यासाठी महापालिका उपाययोजना करणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘महापालिकेने ‘जलयुक्त शहर’ अभियानासाठी यंदा २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात टेकड्यांवर चर खोदणे व रेनवॉटर हार्वेस्टिंगमधून जमलेल्या पाण्याचा वापर करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. सामाजिक संस्था व नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेतले जाणार आहे. आयुक्तांच्या नेतृत्वाखीाल लवकरच ‘ग्राउंड वॉटर सेल’ची स्थापन केली जाणार आहे.’’

शहरातील भूजल पाणीपातळी वाढवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत रूपरेषा निश्‍चित होऊन हे अभियान लवकरच सुरू होईल. 
- व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com