परीक्षेच्यावेळी जॅमर बंधनकारक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसाठी यासंबंधी सूचना जारी केली. या निर्णयाची अंमलबजावणी आगामी काळात घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांच्यावेळी करावी लागणार आहे. 

पुणे - देशातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये; तसेच संलग्न संस्थांमधील परीक्षा केंद्रांमध्ये जॅमर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसाठी यासंबंधी सूचना जारी केली. या निर्णयाची अंमलबजावणी आगामी काळात घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांच्यावेळी करावी लागणार आहे. 

महाविद्यालयीन परीक्षेच्यावेळी मोबाईल वापरण्यास बंदी असली, तरी अनेकवेळा व्हॉट्‌सऍप आणि अन्य सोशल  मीडियाद्वारे पेपरफुटीचे प्रकार घडतात. त्यातून फौजदारी किंवा कायदेशीर कारवाई करण्याची वेळ विद्यापीठे आणि महाविद्यालयांवर येते. त्यातून आता शिक्षण संस्थांची सुटका होणार आहे. आयोगाचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र लिहिले असून, त्यात परीक्षांच्यावेळी महाविद्यालयांत जॅमर लावण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. 

परीक्षा केंद्रांमध्ये कोणत्या प्रकारचे जॅमर बसवावे, याबाबतच्या मॉडेलची यशस्वीरीत्या तपासणी करण्यात आली आहे. हेदेखील त्या पत्रात नमूद केले आहे. जॅमर बसविताना केंद्र सरकारच्या जॅमर धोरणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी; तसेच परीक्षा केंद्रामध्ये जॅमर बसविल्यानंतर परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या परिसरात असलेले मोबाईल टॉवर आणि  जॅमर प्रभाव क्षेत्राच्या क्षमतेचाही या नियमाची अंमलबजावणी करताना विचार करावा लागणार आहे. 

याबाबत प्रा. जैन "सकाळ'शी बोलताना म्हणाले, ""उच्च शिक्षण संस्थांमधील परीक्षाव्यवस्था सुधारण्यासाठी; तसेच परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करताना जॅमर धोरणाच्या सर्व नियमांचे पालन शिक्षण संस्थांनी करायचे आहे.'' 

परीक्षेच्यावेळी जॅमर बसविणे आता विद्यापीठे आणि सर्व संलग्न शिक्षण संस्थांसाठी बंधनकारक असेल. पुढे येणाऱ्या परीक्षांपासून ही व्यवस्था करायची आहे. जॅमर बसविताना त्यापासून शंभर मीटर परिसरात दूरसंचार कंपन्यांचा बेस  ट्रान्सीव्हर स्टेशन (बीटीएस) नसल्याची खातरजमा करून घ्यायची आहे. जेणेकरून अन्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. 
- प्रा. रजनीश जैन, सचिव, विद्यापीठ अनुदान आयोग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jammer binding during exam