इंदापूरच्या जागेबाबत तडजोड नाही - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

इंदापूर - इंदापूरच्या जागेवर काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांचा हक्क आहे. यासंदर्भात पक्षाध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. मात्र, इंदापूरच्या जागेबद्दल तडजोड केली जाणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

इंदापूर - इंदापूरच्या जागेवर काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांचा हक्क आहे. यासंदर्भात पक्षाध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. मात्र, इंदापूरच्या जागेबद्दल तडजोड केली जाणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा बुधवारी इंदापुरात आली. या वेळी चव्हाण बोलत होते. यात्रेस इंदापुरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमापूर्वी भव्य दुचाकी व चारचाकी रॅली काढण्यात आली.
अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘अच्छे दिनचे स्वप्न दाखवून खोटे बोल पण रेटून बोलत सत्तेवर आलेल्यांनी चार वर्षे फसवे राजकारण करत शेती, सहकार, साखर कारखानदारी संपविण्याचा प्रयत्न केला. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता संस्कृती स्वीकारत ते मस्तवाल झाले. २०१४ मध्ये त्यांची बेटी बचाव तर आता बेटी भगाव ही घोषणा आहे.

सैनिकांच्या कुटुंबाबद्दल अपशब्द काढणे, महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र जनतेत मात्र दारिद्य्र अशी बिकट स्थिती झाली आहे. त्यामुळे इंदापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार काँग्रेसचे निवडून आणा.’’

राफेल खरेदी सर्वांत मोठा घोटाळ...
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘१२६ राफेल विमाने ६२३ कोटी रुपयांना घेण्याचे काँग्रेस राजवटीत ठरले. मात्र, त्यानंतर भाजप सरकारने ३६ विमानांची खरेदी १६६० हजार कोटींना केली. यामध्ये ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, हा जगातला सर्वांत मोठा भ्रष्टाचार आहे. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव नाही. युवकांना रोजगार नाही. यासंदर्भात पंतप्रधान मोदी बोलण्यास तयार नाहीत. हर्षवर्धन पाटील यांनी माझ्या मंत्रिमंडळात चांगले काम केले असून, त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे.’’ 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम, आमदार रामहरी रूपनवर व जयकुमार गोरे, दीपक जाधव आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव यांनी मानले.

उमेदवारी जनतेनेच घोषित केली...
जनसंघर्ष यात्रेस मिळालेला प्रतिसाद पाहता हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जनतेने घोषित केली आहे. या लढाईत ते नक्कीच विजयी होतील; तसेच ते एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री बनून तालुक्‍यास भाग्याचा दिवस आणून देतील, असे वक्तव्य माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यास प्रतिसाद दिला.

उजनी धरणाचे पाणी कर्नाटकला चालले. मात्र, तालुक्‍यात २७ तलाव तसेच नीरा नदीवरील बंधारे कोरडे आहेत. प्रशासनावर नियंत्रण नाही. तालुक्‍यात एक नवीन तुकडी मंजूर नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षांत तालुक्‍याचे अतोनात नुकसान झाले. आम्ही लोकसभेस आघाडीचा शब्द पाळायचो. मात्र, त्यांनी विधानसभेस शब्द पाळायचा नाही हे आता चालणार नाही.
- हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्री

‘सरकार उलथवून टाकण्यास सामान्य जनतेने साथ द्यावी’
बारामती - काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा ही महाराष्ट्राच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी आहे. केंद्र व राज्य सरकार उलथविण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. 

जनसंघर्ष यात्रेचे स्वागत बुधवारी बारामती शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले. या वेळी अशोक चव्हाण बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. रत्नाकर महाजन आमदार विश्‍वजित कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, ॲड. आकाश मोरे, वीरधवल गाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले, ‘‘भाजप सरकारने सामान्यांचे जगणे महाग करून टाकले आहे. अनेक प्रश्न समोर आहेत. शेतकरी आत्महत्या होतच आहेत. महागाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अधोगतीला नेला आहे. सुशिक्षित बेरोजगारांचे कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत. म्हणूनच आम्ही महाआघाडी करून आता जनतेच्या समोर जात आहोत. या महायज्ञात सर्वांनी साथ द्यावी.

बारामतीत काँग्रेसची विचारसरणी आणि तिरंगा झेंडा मजबूत करण्याचे काम कार्यकर्ते करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे.’’

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस जनतेशी संपर्क व संवाद करीत आहे. याला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यातील सध्याच्या सरकारच्या विरोधातील जनतेचा आक्रोश यातून दिसत आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jansangharsh yatra Ashok Chavan Talking Politics