पुणे ते बेळगाव दरम्यान जनशताब्दी एक्‍स्प्रेस? 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

अशोकापुरम-हुबळी विश्वमानव एक्‍स्प्रेस गाडीचा हुबळीऐवजी बेळ्गावपर्यंत विस्तार केल्यानंतर औपचारिक कार्यक्रमाद्वारे त्या गाडीचे लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. बेळगाव येथे झालेल्या या कार्यक्रमात अंगदी यांनी पुणे-बेळगाव जनशताब्दी गाडी सुरू करण्याबाबतची माहिती दिली.

पुणे : पुणे-बेळगाव या दोन शहरांना जनशताब्दी एक्‍स्प्रेस रेल्वेने जोडण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे पुणे-सांगली-मिरजमार्गे बेळगावला जलद रेल्वे धावण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे प्रवासी, पर्यटन आणि उद्योगासाठी उपयुक्त ठरेल. 

अशोकापुरम-हुबळी विश्वमानव एक्‍स्प्रेस गाडीचा हुबळीऐवजी बेळ्गावपर्यंत विस्तार केल्यानंतर औपचारिक कार्यक्रमाद्वारे त्या गाडीचे लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. बेळगाव येथे झालेल्या या कार्यक्रमात अंगदी यांनी पुणे-बेळगाव जनशताब्दी गाडी सुरू करण्याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, "पुणे-बेळगावदरम्यान थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने पुणे-बेळगावदरम्यान जनशताब्दी एक्‍स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.'' पुणे ते मिरज आणि मिरजपासून हुबळीपर्यंत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते पुढील दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढण्यात येईल. असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

या गाडीमुळे पर्यटन आणि उद्योगासास चालना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. जमखिंडी, आलमट्टी, बागलकोट, लोकापूर या भागांत सिमेंटचे कारखाने आहेत. तर प्रसिद्ध गोकाक धबधबा, गोकर्ण-महाबळेश्वर यासह अनेक पर्यटन स्थळे आहेत. मात्र, पुणे-बेळगाव अशी थेट रेल्वे गाडी नाही. ही गाडी सुरू झाल्यानंतर प्रवाशांची आणि प्रवासी संघटनांची अनेक वर्षाची मागणी पुर्ण होणार आहे. याबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, "पुणे-बेळगाव दरम्यान जनशताब्दी गाडी सुरू करण्याबाबत हालचाली रेल्वेने सुरू केल्या आहेत. मात्र, ही गाडी बेळगावऐवजी हुबळीपर्यंत नेण्याचा विचार होण्याची गरज आहे.'' 

असा असेल गाडीचा मार्ग 
पुणे-बेळगाव जनशताब्दी एक्‍स्प्रेस पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी सुटेल. बेळगावहून रात्री परत ही गाडी पुण्यात मुक्कामी येईल. गाडीची देखभाल-दुरुस्ती पुण्यात केली जाणार आहे. या गाडीचा प्रवासाचा कालावधी सहा ते साडेसहा तासांचा असेल. रायबाग, कुडची, मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, लोणंद हे थांबे गाडीला दिले जातील, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janshatabdi Express from Pune to Belgaum