#GarbageIssue गोष्ट जनता वसाहतीतील कचऱ्याची (व्हिडिओ)

प्रवीण खुंटे
रविवार, 2 डिसेंबर 2018

पुणे - गोष्ट जनता वसाहतीतील कचऱ्याची... चार वर्षांपूर्वी तो दोन फुटांचा होता. त्या वेळी महापालिकेपासून ते अगदी मुख्यमंत्री कार्यालयांपर्यंत त्याची तक्रार झाली; परंतु ‘स्वच्छ भारत’च्या अभियानात सर्वच अडकलेले. त्यामुळे ‘तो’ आज आठ ते दहा फुटांपर्यंत वाढला आहे. दिवसेंदिवस फुगत आणि पसरतही चालला आहे. एवढेच नव्हे, तर ‘तो’ आजूबाजूच्यांना त्रासही देऊ लागला आहे. ही आहे स्वच्छता अभियानाची वस्तुस्थिती!

पुणे - गोष्ट जनता वसाहतीतील कचऱ्याची... चार वर्षांपूर्वी तो दोन फुटांचा होता. त्या वेळी महापालिकेपासून ते अगदी मुख्यमंत्री कार्यालयांपर्यंत त्याची तक्रार झाली; परंतु ‘स्वच्छ भारत’च्या अभियानात सर्वच अडकलेले. त्यामुळे ‘तो’ आज आठ ते दहा फुटांपर्यंत वाढला आहे. दिवसेंदिवस फुगत आणि पसरतही चालला आहे. एवढेच नव्हे, तर ‘तो’ आजूबाजूच्यांना त्रासही देऊ लागला आहे. ही आहे स्वच्छता अभियानाची वस्तुस्थिती!

जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक ४९ मधील सार्वजनिक शौचालयामागील कचऱ्याची ही गोष्ट आहे. आता ‘तो’ शौचालयांच्या खिडकीमधून आतमध्ये पडत आहे. ‘तो’ ड्रेनेजच्या लाइनमध्ये गेल्याने आणि त्या तुंबल्यामुळे दररोज सकाळी गल्ली बोळांमधून सांडपाण्याचे पाट वाहत आहेत. त्याला येथून हलवावा, यासाठी मागील तीन-चार वर्षांपासून क्षेत्रीय कार्यालयापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना अर्ज विनंत्या करून झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी मिळून सह्यांची मोहीम, आंदोलने, कार्यकर्त्यांना अटक होण्यापर्यंतचे प्रकार या कालवधीत घडले; परंतु एवढे सगळे प्रयत्न होऊनही ‘तो’ मात्र जागेवरून किंचितसाही हललेला नाही.

‘त्याच्या’ या दिवसेंदिवस वाढत्या वयामुळे आता दुर्गंधी, डास, डुकरे हा मित्र परिवारही त्या परिसरात वाढू लागला आहे. अशा या परिस्थितीतही शेकडो कुटुंब तिथे रहात आहेत. त्याच्यामुळे प्रदूषित वातावरणाने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. डेंग्यू, मलेरिया आणि डुकरांच्या वावरामुळे स्वाइन फ्लू झाल्याच्या अनेक घटना इथे घडल्या आहेत. 

दरवर्षी आम्ही स्थानिक नगरसेवक, क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना अर्ज दिले आहेत. मात्र, त्यांच्याकडून आम्ही टेंडर लावून कचरा काढू, असेच सांगण्यात येते. या घाणीमुळे मच्छर, दुर्गंधीचा प्रचंड त्रास होतो. ड्रेनेजचे पाणी दारासमोरूनच वाहत असल्यामुळे चालणेसुद्धा अवघड होऊन जाते.
- नरेंद्र गंजे, स्थानिक तरुण

हा कचरा उचलण्याबाबतीत आम्ही अनेकदा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी बोललो आहोत; परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. यासाठी आंदोलने झाली आहेत. कार्यकर्त्यांना अटकही झाली आहे. तरीही हा प्रश्‍न सुटत नाही. आम्ही पुन्हा एकदा या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलू.
- आनंद रिठे, स्थानिक नगरसेवक

या ठिकाणचा कचरा तातडीने साफ केला जाईल. तेथील कार्यकर्त्यांनी या विषयीची माहिती आम्हाला आणून द्यावी. आम्ही लगेच कामाला लागू.
- ज्ञानेश्‍वर मोळक,  घनकचरा विभाग प्रमुख, पुणे महापालिका

Web Title: Janta vasahat garbage issue in pune