जावडेकरांच्या वक्तव्याचा सोशल मिडीयावर समाचार

मिनाक्षी गुरव
रविवार, 16 सप्टेंबर 2018

पुणे : "शाळा सरकारकडे मदत मागण्यासाठी कटोरा घेऊन येतात.'' असे वक्तव्य करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. जावडेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शहरातील विविध संस्था, संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. 

पुणे : "शाळा सरकारकडे मदत मागण्यासाठी कटोरा घेऊन येतात.'' असे वक्तव्य करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. जावडेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शहरातील विविध संस्था, संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. 

"शाळा भीक मागत नाही, हक्काचे अनुदान मागतात, तुम्हाला जमत नसेल तर ते आम्ही करू'', अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. "प्रकाश जावडेकर यांनी हे वक्तव्य करून ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या समस्त मंडळींचा अपमान केला आहे. या सरकारकडे शाळांना देण्यासाठी पैसा नाही, मात्र अस्तित्वात नसलेल्या जिओ विद्यापीठाला शेकडो कोटी रुपयांची खेरात देण्यासाठी निधी आहे. जावडेकर यांच्या वक्तव्यातून भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती उघड होऊ लागली आहे.'', असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. "जावडेकर यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा कटोरा भेट म्हणून देण्यात येईल', असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे. 

"शैक्षणिक सुविधा हा आमचा हक्क आहे, जावडेकर यांनी भिकेचा कटोरा अशी भाषा करणे हे निंदनीय आहे'', अस आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांचे म्हणणे आहे. किर्दत म्हणाले, "सरकारची जबाबदारी असलेल्या शैक्षणिक सुविधांसाठी मागितलेले अनुदान हे भीक नसते. कटोरा घेऊन शाळा येतात ही भाषा म्हणजे स्वतःची जबाबदारी नाकारण्यासारखे आहे. जावडेकर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध आम्ही नोंदवीत आहोत.'' जागरुक नागरिकांनी फेसबुक, ट्‌विटर यांसह अन्य सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त करत जावडेकर यांच्या वक्‍तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

 

Web Title: Javadekar's statement is trolled on Social media