आमदार भरणेंनी काम चांगले केले पण... जयंत पाटील

pune
pune

इंदापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुक आघाडीची चर्चा सुरू असून ती अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी चांगले काम केले असून सुद्धा त्यांनी व कार्यकर्त्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. पक्ष त्यांना अंतर देणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत इंदापूर नगरपालिकेच्या प्रांगणात केल्यानंतर यात्रेचा समारोप इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात विराट सभेने करण्यात आला. सभेस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व धनंजय मुंडे न आल्याने उपस्थित नाराज झाले. मात्र खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रभावी भाषणामुळे त्यांची उणीव भरून निघाली. यावेळी किसनराव खाडे यांच्यासह अनेकांनी आमदार भरणे यांना पुन्हा आमदारकीच्या तिकीटाची आग्रही मागणी केली. 

पाटील पुढे म्हणाले, राज्यातील 6 लाख उद्योग बंद पडले असून गाडी उद्योगातील 70 टक्के मागण्या कमी झाल्या आहेत तर नोकरीचे काही खरे राहिले नाही. सहकारी चळवळीने ग्रामीण अर्थकारण मजबूत केले आहे. त्याला तिलांजली देण्याचे काम भाजपचे सरकार करत आहे. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याच्या कारणावरून अजित पवार यांच्यासह 56 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. भाजपच्या नेत्यांची त्यातनावे असताना फक्त अजित पवार यांना धारेवर धरले जात आहे. मागील निवडणुकीत शरद पवार यांच्यावर 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. मात्र ते आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे शरद पवार हे मोठे विद्यापीठ असून शिवछत्रपतींच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र उभा करण्यासाठी त्यांना साथ देणे गरजेचे आहे. राजकारणाची सद्यस्थिती लक्षात घेता आपली सोय न पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल त्याचा आपण पुरस्कार करणे गरजेचे आहे. 

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सयाजीराजे गायकवाड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी रयतेचे राज्य केले. या राज्यात माता भगिनींना सन्मान, युवकांना भवितव्य तसेच सर्वधर्म समभाव होता. त्यामुळे या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने अनेक माता भगिनींचे कुंकू पुसले गेले तर अनेक मुले पोरकी झाली. राज्यात 1 लाख 25 हजार गुन्हे दाखल झाले असून त्यात 16 हजार बलात्कार व 36 हजार विनयभंगाचे गुन्हे आहेत. युवकांना काम नाही. त्यापार्श्वभूमीवर आवाज उठवणाऱ्याची ईडी चौकशी केली जाते, त्यांना त्रास दिला जातो. त्यामुळे अनेकांनी पक्ष सोडले. मात्र यंदा शरद पवार यांच्याच विचारांची लाट येणार आहे.  

आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्य तसेच तालुक्यातील राजकीय स्थिती वेगळी असून येथे  ग्रामपंचायत ते आमदारकीपर्यंत आम्हास काँग्रेसशी लढावे लागते. पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदारकीची संधी दिल्यानंतर विरोधीपक्षाचा आमदार म्हणून 900 कोटी रुपयांचा विक्रमी निधी आणला. पाऊस पडला नाही मात्र निरा, भीमा नदीचे पाणी कर्नाटकात गेले. अजित पवार पालक मंत्री असताना तालुक्यास नियमित पाणी मिळाले. मात्र सध्या दुष्काळाचे देखील राजकारण विरोधक करत आहेत. राजकारणात कोणी ताम्रपट घेऊन येत नाही. मात्र नवसाने देखील मिळणार नाहीत अशी चांगली माणसे मला मिळाली. त्यामुळेपक्षास जो राजकीय निर्णय घ्यायचा तो घ्या, मात्र पक्ष सेवा करण्यास आपण सर्वोच्च प्राधान्य देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. 

यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हाजीसय्यद इर्शादभाई अत्तार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, डॉ. अर्चना पाटील, धनंजय बाब्रस, प्रदेश उपाध्यक्ष भारती शेवाळे, गौरीहर मारकड, भाऊसाहेब सपकळ, रमेश पाटील, विठ्ठल ननवरे, अमोल भिसे, आझाद मुलाणी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील तर सुत्रसंचलन भास्कर जगताप व विलास दौतोंडे यांनी केले. यावेळी आप्पासाहेब जगदाळे, दशरथ माने, बाळासाहेब घोलप, प्रताप पाटील, राजेंद्र तांबिले, प्रविण माने, किसनराव जावळे, श्रीधर बाब्रस, अनिकेत वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com