नाट्य संमेलनाध्यक्ष "शो केस'मधील वस्तू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पुणे - ""नाट्य संमेलनाध्यक्षाला कुठलाही अधिकार नाही, असे आजवरचे अध्यक्ष ओरडून- ओरडून सांगत होते; पण अजूनही कुठला अधिकार मिळाला नाही, त्यामुळे नाट्य संमेलनाध्यक्ष या नात्याने मी "हे करीन', "ते करीन' असे कधीच म्हणणार नाही. नाट्य संमेलनाध्यक्ष म्हणजे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नव्हे; हे पद केवळ "शो केस'मधल्या शोभेच्या वस्तूंसारखे आहे,'' अशी खंत नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी बुधवारी व्यक्त केली. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (पुणे शाखा) वतीने आयोजित दोन मिनिटांच्या नाटिका महोत्सवात सावरकर यांचा विशेष सत्कार व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष अविनाश देशमुख, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, कोशाध्यक्ष मेघराजराजे भोसले, कार्यवाह निकिता मोघे, "महाराष्ट्र कल्चरल सेंटर'च्या शुभांगी दामले उपस्थित होत्या. 

सावरकर म्हणाले, ""कलाकारांसाठी घर, त्यांचे मानधन, नाट्यगृहाची स्थिती अशा नाट्य व्यवसायासमोर अनेक अडचणी आहेत, त्या सोडवण्याचा अधिकार मला नाही; पण त्या अडचणी मुळापासून मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अध्यक्षीय भाषणात स्पष्टपणे बोलणार आहे. कदाचित भाषण स्फोटकही होऊ शकेल; पण प्रश्‍नांना वाचा फोडणारे असेल.'' 

तेंडुलकर म्हणाले, ""नाट्य संमेलनाध्यक्षाची अगतिकता सावरकर यांनी व्यक्त केली; पण ते स्पष्टपणे बोलणार आहेत, हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण स्पष्टपणे बोलणारेसुद्धा हल्ली पाहायला मिळत नाहीत.'' 
मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. 

तेंडुलकरांचा पदाधिकाऱ्यांना चिमटा 
नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे काम ठप्प झाले आहे, अशी चर्चा गेले काही महिने सुरू होती. या पार्श्‍वभूमीवर, ""नाट्य परिषद कधी-कधीच चांगले कार्यक्रम आयोजित करते,'' अशा शब्दांत तेंडुलकर यांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना चिमटा काढला, त्यामुळे सभागृहात हास्याची कारंजी उडाली. सावरकरांचा सत्कार सोहळा आणि दोन मिनिटांच्या नाटिका पाहण्यासाठी या वेळी सभागृह तुडुंब भरले होते.

Web Title: jayant sawarkar natya sammelan