जिजामाता रुग्णालयाचे काम पूर्ण

पिंपरी - महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या जिजामाता रुग्णालयाची इमारत.
पिंपरी - महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या जिजामाता रुग्णालयाची इमारत.

पिंपरी - महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या जिजामाता या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या स्थापत्य विभागाचे काम पूर्ण झाल्याने येत्या दोन महिन्यांत ते कार्यरत होण्याची शक्‍यता आहे. या रुग्णालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर वायसीएम रुग्णालयावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

वायसीएम रुग्णालयाची क्षमता ३०० खाटांची आहे. शहराबरोबरच राज्याच्या विविध भागांतील नागरिक येथे उपचारासाठी येत असल्याने या रुग्णालयाच्या सेवेवर खूप ताण येत होता. तो कमी करण्यासाठी सुमारे सहा हजार ७१९ चौरस मीटर क्षेत्रफळावर ३६ कोटी रुपये खर्चून १०० खाटांची क्षमता असलेले जिजामाता रुग्णालय उभारण्यात आले आहे. स्टिल्ट फ्लोअरव्यतिरिक्त रुग्णालयाची इमारत चार मजली आहे. येथे मोटारीखेरीज १०० दुचाकी वाहनांची पार्किंगची सुविधा आहे. अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

स्थापत्य विभागाचे काम ३१ मे २०१८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात दोन महिने उशिराने ते पूर्ण झाले. सध्या बांधकामामुळे पडलेला राडारोडा उचलून रुग्णालयाच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. पिंपरीगाव, चिंचवड, रहाटणी, पिंपळे गुरव या भागांतील नागरिकांना या रुग्णालयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. 

रुग्णालयासाठी लागणारे फर्निचर तयार करण्यासाठीची निविदा काढण्याची प्रक्रिया भांडार विभागाने सुरू केली आहे; तसेच रुग्णालयासाठी लागणाऱ्या खाटा, खुर्च्या, शस्त्रक्रियेसाठी लागणारे टेबल इत्यादी वैद्यकीय साहित्याची खरेदी भांडार विभागाच्या वतीने करण्यात येणार येणार असल्याचे उपअभियंता विनय ओव्हाळ यांनी सांगितले.

जिजामाता रुग्णालयाचा ताबा अद्याप भूमी आणि जिंदगी विभागाकडून वैद्यकीय विभागाकडे आलेला नाही. आमच्याकडे ताबा आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्‍त आरोग्य वैद्यकीय अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com