
आशय दर्जेदार हवा : नामांकित यु-ट्युबर्सचा सल्ला
पुणे :‘‘तुम्हाला जे आवडत, ज्यातून आनंद मिळतो, ते करा आणि त्यातून आशय (कन्टेट) निर्मिती करा. चांगला आशय निर्माण करणे, हे आव्हानात्मक असले तरी ते तितकेसे अवघडही नाही. चांगला आशयाचा शोध घेण्याची गरज नाही. तुम्हाला येणारे अनुभव, आजूबाजूला असणाऱ्या परिस्थितीचे निरीक्षणातून आशय निर्मिती होऊ शकते. आशय हा दर्जेदार असणे गरजेचे आहे,’’ असा सल्ला देशातील नामांकित ‘यु-ट्युबर्स’ने दिला.
‘जीतो कनेक्ट २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘क्रिएटर इकॉनॉमी’ विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात अभिनेत्री कल्की कोचलीन, यु-ट्युबर निकुंज लोटिया, तन्मय भट, ‘ओन्ली मच लाऊडर’चे (ओएमएल) उपाध्यक्ष ऋषभ नहार सहभागी झाले होते. जीतो युथ विंगच्या सचिव रिंकल पगारिया यांनी मान्यवरांची संवाद साधला. यु-ट्युब, इन्स्टाग्राम अशा सोशल नेटवर्किंग साईटवर आशय निर्मिती करण्याच्या व्यवसायातील अर्थकारण याविषयी मान्यवरांनी विचार मांडले.
कल्की म्हणाल्या,‘‘चांगला आशय निर्माण करण्याचे आव्हान प्रत्येकासमोरच असते. परंतु सध्या उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा विचार करता ते फार अवघडही नाही. चांगला आशय शोधणे आणि निर्माण करणे अवघड असले तरीही तुमचे जीवन हेच तुम्हाला आशय देत असते. फक्त त्यातून उत्तम सादरीकरण तुम्हाला करता यायला हवे. त्यामुळे जीवन जगताना प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करत रहा, त्यातून तुम्हाला आशय आपोआप मिळेल.’’ यालाच दुजोरा देत लोटिया म्हणाले,‘‘तुम्हाला आवडते ते तुम्ही करा, म्हणजे आशय निर्माण करण्याची प्रक्रिया अवघड वाटणार नाही. प्रत्येक सोशल मिडियाच्या व्यासपीठावर प्रेक्षक (व्ह्युवर्स) आहेत, फक्त तुमचा आशय दर्जेदार असायला हवा. तुमच्याकडे काही सांगण्यासारखे (स्टोरी) असल्यास जरूर सांगा, अन्य गोष्टींची पर्वा करून नका. सातत्याने प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.’’
‘‘तुम्ही आशय निर्माते (कटेंट क्रिएटर) म्हणून लोकांना काय देता, यावर तुमचे अर्थार्जन अवलंबून असते. भविष्यात मेटावर्स सारखे व्यासपीठ उपलब्ध असतील, त्यात प्रेक्षक हे देखील त्या आशयाचा भाग असतील,’’ असे भट यांनी सूचित केले.
यशस्वी ‘यु-ट्युबर’ होण्यासाठी मान्यवरांनी दिलेला कानमंत्र
१. आशय निर्मिती (कन्टेट क्रिएशन) करताना सातत्य राखा
२. आनंद, आवड म्हणून आयश निर्मिती करण्याचा हवा दृष्टिकोन
३. आशय निर्मिती करताना स्वत:ची शिस्त पाळा
४. आव्हान म्हणून नवे तर संधी म्हणून आशय निर्मिती करण्याकडे पहा
५. जीवन जगताना निरीक्षणवृत्ती जोपासा, त्यातून आशय मिळू शकतो
‘कन्टेंट क्रिएशन’चे भविष्य
कोरोनाच्या काळात मोठ्या पडद्यावरून लोकांचा कल थेट मोबाईल स्क्रिनवर वाढला. सोशल मिडियावर फुड, फॅशन, ट्रॅव्हल याचबरोबर गेमिंग प्रकारातील आशय निर्मिती वाढली आहे. त्यामुळे भविष्यात ‘गेमिंग कन्टेंट क्रिएशन’वर भर दिला जाईल. आपल्या आयुष्यतील प्रसंग, क्षण यालाच आशय म्हणून लोकांपर्यंत पोचवू शकतो. अशा प्रसंगातून आशय निर्मिती होऊ शकते हे प्रत्येकालाच समजते असे नाही. आशयाचे सादरीकरण करताना लोकांना त्याच्याशी जोडता आले पाहिजे. प्रेक्षक काय पाहण्यास इच्छुक आहेत किंवा प्राधान्य देत आहेत ते लक्षात घेऊन आशयाची निवड करावी. असे ही या यु-ट्युबर्सने सांगितले.
पारंपरिक माध्यमांची जागा आता यूट्यूब, इन्स्टाग्रॅम, फेसबुक, ओटीटी प्लॉटफॉर्म, वेगवेगळे व्हिडीओ ॲप्स यांनी घेतली आहे. या क्षेत्राला करिअर म्हणून निवडले जात असले तरी सुद्धा या क्षेत्राबाबत काहीही निश्चित सांगता येत नाही. आशय निर्मिती क्षेत्रात ४० बिलीयन डॉलर्सची उलाढाल आहे. भारतातील आशय निर्मितीवर पाश्चिमात्य देशातील निर्मात्यांचा प्रभाव दिसतो.
- ऋषभ नहार, उपाध्यक्ष, ओएमएल