८० जणांना घरे; १५५ प्रतीक्षेत (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पिंपरी - महापालिकेच्या जेएनएनयूआरएम-बीएसयूपी योजनेंतर्गत उभारलेल्या विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील २३५ सदनिकांचे वाटप गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यातील ८० सदनिकांची नुकतीच सोडत काढली. त्यांचा ताबा लवकरच महापालिकेतर्फे रहिवाशांना दिला जाणार आहे. तथापि, १५५ कुटुंबीयांना मात्र, घरांसाठी प्रतीक्षा कायम आहे.

पिंपरी - महापालिकेच्या जेएनएनयूआरएम-बीएसयूपी योजनेंतर्गत उभारलेल्या विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील २३५ सदनिकांचे वाटप गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यातील ८० सदनिकांची नुकतीच सोडत काढली. त्यांचा ताबा लवकरच महापालिकेतर्फे रहिवाशांना दिला जाणार आहे. तथापि, १५५ कुटुंबीयांना मात्र, घरांसाठी प्रतीक्षा कायम आहे.

ताबा देण्यापूर्वी रस्ता, अन्य प्रमुख सुविधा द्याव्यात, अशी रहिवाशांची मागणी आहे.

विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात १३ इमारतीत १४५६ सदनिका बांधल्या. ६ इमारतीतील सदनिकांना १० फेब्रुवारी २०११ ला, ६ इमारतीतील सदनिकांना नोव्हेंबर २०१२ अखेर व एका इमारतीतील सदनिकांना एप्रिल २०१३ मध्ये बांधकाम पूर्णत्व दाखला मिळाला. नोव्हेंबर २०१२ मध्ये बांधून पूर्ण झालेल्या दोन इमारतीतील २२४ सदनिका आणि एका इमारतीतील शिल्लक ११ सदनिकांचे सहा वर्षांनंतर वाटप झाले नाही. त्यातील ए-९ या इमारतीतील ८० सदनिकांच्या वाटपासाठी नुकतीच सोडत काढली. संबंधित लाभार्थ्यांसमवेत करारनामा करून त्यांना महापालिकेतर्फे लवकरच सदनिकांचा ताबा दिला जाणार आहे. 

प्रकल्पातील नव्याने ताबा देण्यात येणाऱ्या इमारतीची स्थिती तसेच नागरिकांची मते ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने प्रकल्पाला भेट देऊन जाणून घेतली. 

विठ्ठलनगर येथे नागरिकांसाठी महापालिकेने इमारतीजवळ जोडरस्ता करावा. अग्निशामक दलाचे वाहन, ॲम्ब्युलन्स येथे पोचू शकणार नाही, अशी स्थिती आहे. इमारतीजवळ वाढलेली झाडी काढावीत, नाल्याची स्वच्छता करावी.
- यशोदा बनसोडे, किशोर ढोबळे, नागरिक 

प्रकल्पातील फुटलेल्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करावी. विटा, वायरीचे तुकडे, तारा, खिळे पडलेले आहेत. पार्किंगमध्ये उभे राहण्यासही अडचण आहे. 
- विकी साळवे, नागरिक

रस्ता दुरुस्तीची प्रमुख मागणी आहे. ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही सदनिकांचा ताबा घेणार नाही. 
- अनिल सुरवसे, नागरिक

आवश्‍यक दुरुस्ती, करारनामा करून लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा दिला जाणार आहे. स्वहिस्सा भरणाऱ्या, पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील टप्प्यात सदनिका दिल्या जातील. 
- चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त

दृष्टिक्षेपात प्रकल्प 
 प्रकल्पात बांधलेल्या सदनिका : १४५६
 प्रकल्पावर झालेला खर्च : ६८.९६ कोटी
 वाटप झालेल्या सदनिका : १२२१
 वाटपासाठी प्रलंबित सदनिका : २३५

Web Title: JNNURM-BSUP Scheme Slum Rehabilitation