तरुणांना कौशल्य विकासाचे धडे द्या! 

NDA Passing out parade
NDA Passing out parade

पुणे : 'विज्ञान आणि तंत्रज्ञान ही न्याय्य समाजाच्या स्थापनेची प्रभावी साधने आहेत. त्या आधारावर तरुणांना कौशल्य विकासाचे धडे देता येतील. त्यामुळे भविष्यात पदवीधर नोकरी मागणाऱ्यांच्या रांगांमध्ये उभे न राहता ते रोजगार निर्मितीचे काम करतील,'' असा विश्‍वास दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू प्रा. डॉ. एम. जगदेश कुमार यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. 

'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी'च्या (एनडीए) 131व्या तुकडीचे पदवीप्रदान डॉ. कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 'एनडीए'चे कमांडंट एअर मार्शल जे. एस. क्‍लेर, उपप्रमुख रिअर ऍडमिरल एस. के. ग्रेव्हाल, प्राचार्य ओम प्रकाश शुक्‍ला आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

कुमार म्हणाले, ''बेरोजगारी, भ्रष्टाचार, अकुशल कामगार, योग्य संधी न मिळणे या समस्या आपल्या सगळ्यांना भेडसावत आहेत. त्याचबरोबर उच्च शिक्षण हे त्यातील एक मोठे आव्हान आहे. समाजात आजही उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचले पाहिजे. या प्रत्येक समस्येचे उत्तर आपल्याला ज्ञानातून मिळते. 'एनडीए', 'जेएनयू' किंवा 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी' (आयआयटी) यात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या तीन टक्‍क्‍यांहून अधिक नाही. त्यामुळे देशाचे भविष्य बदलण्यासाठी उच्च शिक्षणाची संधी प्रत्येक विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिली पाहिजे.'' 

देशातील 60 टक्के विद्यापीठ आणि 90 टक्के महाविद्यालयांमधील शैक्षणिक गुणवत्ता ही सरासरीपेक्षा कमी असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ''देशात आता तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांना योग्य वेळी प्रभावी शिक्षण दिले पाहिजे. अन्यथा हा तरुण म्हणजे एक 'टाइम बॉंब' होईल. न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी उच्च शिक्षण हाच प्रभावी उपाय आहे.'' 

174 विद्यार्थ्यांना पदवीप्रदान 
'एनडीए'मधील 131व्या तुकडीतून 174 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान, संगणकशास्त्र आणि कला या तीन शाखांमधून त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी मिळाली. त्यात चार परदेशी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. स्कॉड्रन कॅडेट कॅप्टन अमरप्रीत सिंग धत्त याला विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळाला. तसेच तिन्ही शाखांमधील सर्वाधिक गुण मिळाले आहेत. कॅडेट अलावत रघुविंदर याने संगणकशास्त्रात पहिला तर, बटालियन कॅडेट कॅप्टन सतीश चौहान याने कला शाखेत अव्वल क्रमांक मिळविला. यांना कुमार यांच्या हस्ते रौप्यपदक आणि चषक प्रदान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com