पाध्ये दांपत्याने उलगडला बोलक्‍या बाहुल्यांचा प्रवास

Ramdas-and-Aparna
Ramdas-and-Aparna

पिंपरी - बोलक्‍या बाहुलीकार रामदास पाध्ये, अपर्णा पाध्ये यांनी बोलक्‍या बाहुल्यांचा शंभर वर्षाचा प्रवास उलगडला. निमित्त होते रोटरी क्‍लब ऑफ चिंचवडने आयोजित केलेल्या शिशिर व्याख्यानमालेच्या समारोपाचे. या वेळी पाध्ये दांपत्याने रंगवलेल्या ‘अर्धवटराव व आवडी’ बोलक्‍या बाहुल्यांच्या पात्रांसाठी त्यांना कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

क्‍लबचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, सचिव प्रवीण गुणवरे, राजन लाखे, प्रकल्प प्रमुख संजय खानोलकर उपस्थित होते. 

पाध्ये म्हणाले, ‘‘माझे वडील प्रा. वाय. के. पाध्ये हे जादूचे प्रयोग करत. नंतर त्यांना बोलक्‍या बाहुल्यांची कल्पना सुचली. वडिलांनी परदेशातून मागविलेल्या बाहुल्यांचे अर्धवटराव, आवडी आणि त्यांची मुले गंपू-चंपू असे नामकरण केले. शब्दभ्रमणाचे ११ वर्षे धडे घेतल्यानंतर वडिलांच्या कार्यक्रमात केवळ पाच मिनिटे प्रयोग करण्याची मला संधी मिळाली. दुर्दैवाने आठ दिवसांत वडिलांचा हृदय विकाराने मृत्यू झाला. मग बोलक्‍या बाहुल्यांचे प्रयोग करण्याचे आणि वडिलांची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचे शिवधनुष्य उचलले. सुरुवातीला हॉटेलमध्ये खेळ करत होतो. एका अमेरिकन व्यक्तीने ते पाहिल्यावर मला अमेरिकेतील टीव्हीवर शो करण्याची संधी मिळाली.’’

ते म्हणाले, ‘‘बोलक्‍या बाहुल्यांनी परदेशवारी, गाडी, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवून दिली. माझ्या बाहुल्यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चनपासून ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सिनेमात कामे केली. ही परंपरा माझा मुलगा सत्यजित सीए असूनही तो चालवीत आहे. बाहुल्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तो सुंदर प्रयोग करतो. प्रयोगातून आम्हाला किती पैसे मिळतील, यापेक्षा प्रबोधन आणि मनोरंजन कसे होईल याकडे आम्ही अधिक लक्ष देतो.’’

शंभर वर्षांचा प्रवासाचे सेलिब्रेशन हे बाहुल्यांचे शंभर प्रयोग करून साजरे केले जाणार असल्याची माहिती अपर्णा पाध्ये यांनी दिली. 

पाध्ये यांची मुलाखत सौरभ सोहनी यांनी घेतली. प्रा. शिल्पागौरी गणपुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण गुणवरे यांनी आभार मानले.

सावरकरांचे कार्य ‘भारतरत्न’पेक्षा मोठे - पोंक्षे
‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर क्रांतिकारक, महान लेखक-नाटककार, महाकवी आणि विज्ञाननिष्ठ समाजसुधारक होते. मात्र त्यांना आजतागायत भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही. तसे झाल्यास त्या पुरस्काराचा सन्मान होईल. त्यांचे कार्य भारतरत्न पुरस्कारापेक्षाही मोठे आहे,’’ असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

शिशिर व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत हिंदुस्थान’ या विषयावर पोंक्षे बोलत होते. क्‍लबचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, सचिव प्रवीण गुणवरे यांच्या हस्ते कातकरी समाजातील मुलींचा सांभाळ करणारे अंजली व मकरंद घारपुरे या दांपत्याला ‘सेवा गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. 

पोंक्षे म्हणाले, ‘‘आपल्या देशात करोडो रुपये घेऊन खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना भारतरत्न दिला जातो. मात्र देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या सावरकर यांना पुरस्कार दिला जात नाही. सध्या सावरकर यांच्या नावावरून राजकारण सुरू असून ते खेदजनक आहे. सावरकर या मातीत रुजले. परंतु दुर्दैवाने पिकले नाहीत. 

केवळ ते जातीयवादाच्या राजकारणात भरडले गेले. भारतात ८० टक्के हिंदू असल्याने 
हिंदू देश म्हणून ओळख मिळाली पाहिजे.’’ किरण लाखे यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर दीक्षित यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com