तुमच्या घरातही तुम्ही असेच थुंकता का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

 जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात गुटखा, तंबाखू व मावा खाऊन थुंकणाऱ्या तिघांना गुरुवारी ताब्यात घेऊन विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायाधीशांनी तिघांना चांगलेच फैलावर घेत तुमच्या घरातही तुम्ही असेच थुंकता का, असा संतप्त सवाल केला.

पुणे - जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात गुटखा, तंबाखू व मावा खाऊन थुंकणाऱ्या तिघांना गुरुवारी ताब्यात घेऊन विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायाधीशांनी तिघांना चांगलेच फैलावर घेत तुमच्या घरातही तुम्ही असेच थुंकता का, असा संतप्त सवाल केला.

न्यायालयाची पवित्रता राखत नसलेल्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांनी न्यायालयीन परिसरात अस्वच्छता करणाऱ्यांना दोन हजार रुपये दंड किंवा तीन महिने कारावासाची शिक्षा दिली जाईल, असे परिपत्रक काढले होते. त्यानुसार न्यायालय आवारात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करता यावी, यासाठी पोलिस, शिपाई आणि वकिलांचे पथक तयार केले आहे. 

या पथकातील ॲड. विकास शिंदे, ॲड. दीप्ती राजपूत, पोलिस हवालदार सुनील शिंदे, श्रेयस साळवी, आशिष पवार आणि आझाद पाटील हे न्यायालयात कारवाईच्या उद्देशाने पाहणी करीत असताना राम पांडुरंग मोरे (वय ६३, रा. देहू), विशाल पंढरी शिंदे (वय २२, रा. औसा, लातूर) आणि प्रशांत दिलीप यादव (वय ३३, रा. चिंचवड, पुणे) हे तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकत असल्याचे निदर्शनास आले. त्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यापुढेदेखील कारवाई करण्यात येणार असल्याचे ॲड. विकास शिंदे यांनी सांगितले.

माफीनाम्यावर त्यांची सुटका
न्यायालयात तंबाखू खाऊन थुंकल्यामुळे आमच्याकडून अस्वच्छता झाली आहे. त्याबद्दल आम्ही माफी मागत असून, यापुढे आम्ही सार्वजनिक ठिकाणी, न्यायालयात वावरताना कोणत्याही प्रकारे अस्वच्छता होणार नाही, याची काळजी घेऊ. न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी आयुष्यात पुन्हा कोणत्याही प्रकारची अस्वच्छता करणार नाही, असा माफीनामा त्यांच्याकडून लिहून घेण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The judges questioned why you spit like this in your house