निकालाची नक्कल मिळणे ठरतेय डोकेदुखी

निकालाची नक्कल मिळणे ठरतेय डोकेदुखी

पुणे - सरकारी कार्यालयांतील कामांबाबत प्रचलित असलेली ‘सरकारी काम, थोडं थांब’ ही म्हण आता न्यायालयातील प्रशासकीय कामाबाबत लागू होऊ लागली आहे. दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ स्तर न्यायालयाने कौटुंबिक वादाबाबत दिलेल्या निकालाची प्रमाणित प्रत (नक्कल) मिळण्यासाठी वकील आणि पक्षकारांना दीड ते दोन महिने वाट पाहावी लागत आहे.

कुटुंब न्यायालयाप्रमाणे दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ स्तर विभागात कौटुंबिक वादाबाबतच्या आदेशांची नक्कल देण्यासाठी स्वतंत्र  विभाग नाही. विविध आदेशांची नक्कल मिळविण्यासाठी दिवाणी न्यायालयात दररोज सुमारे  पाचशे अर्ज येतात. त्यातील किमान १५० अर्ज हे कौटुंबिक वादात झालेल्या निकालांबाबतचे असतात. मात्र, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने कौटुंबिक वादांची  स्थितीदेखील दिवाणी दाव्यांप्रमाणे झाली आहे. 

वेळेत नक्कल मिळत नसल्याने दुसऱ्या लग्नाचा मार्ग मोकळा होणे, निकालाविरोधात अपील करणे, वसुलीचा अर्ज करणे, मनाई आदेश देणे, मुलांच्या भेटीचा आदेश आदी बाबी अडून राहत आहेत. त्यामुळे न्याय मिळाला, तरी तो त्वरित लागू होत नाही. तसेच, नक्कल मिळविण्यासाठी चकरा माराव्या लागत असल्याचे पक्षकार सांगत आहेत.

घटस्फोट, अंतरिम पोटगी, पोटगीवसुली, मुलांचा ताबा, हुकूमनामा आदींच्या आदेशाची नक्कल देण्यासाठी दिवाणी न्यायालयात स्वतंत्र विभाग नाही. त्यामुळे निकालानंतर दीड ते दोन महिने प्रत मिळत नाही. 

त्या ठिकाणी कौटुंबिक न्यायालयाप्रमाणे यंत्रणा  उभारावी, अशी मागणी ॲड. झाकिर मणियार यांनी केली. नकलेसाठी अर्ज केल्यानंतर त्याची छाननी होऊन तो संबंधित न्यायालयात जातो. त्यानंतर संबंधित निकालाची झेरॉक्‍स प्रत तयार करून त्यावर सही, शिक्का दिला जातो. नकलेचा अर्ज पोचला की नाही? याची खातरजमादेखील वकिलांनाच करावी लागते, असे मणियार यांनी सांगितले. 


घटस्फोटाच्या निकालाची नक्कल मिळण्यासाठी मला तीन महिने वाट पाहावी लागली. न्यायालयातून निकाल आला नाही, त्यावर सही झालेली नाही, निकालाची झेरॉक्‍स काढण्यात आलेली नाही, सही करणारा अधिकारी सुटीवर आहे, अशी विविध कारणे मला देण्यात आली होती. 
- अर्जदार महिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com