जुन्नरची जंबो द्राक्षे चीन व श्रीलंकेत (व्हिडिओ)

नारायणवाडी (ता. जुन्नर) - शिवाजी तोडकरी यांच्या द्राक्षबागेत द्राक्षाची निवड करून पेट्या भरताना व्यापारी.
नारायणवाडी (ता. जुन्नर) - शिवाजी तोडकरी यांच्या द्राक्षबागेत द्राक्षाची निवड करून पेट्या भरताना व्यापारी.

नारायणगाव - जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद सीडलेस या काळ्या जातीच्या द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. तालुक्‍यातून आजअखेर पंधरा कंटेनरमधून दीडशे टन द्राक्ष चीन व श्रीलंका या देशात निर्यात झाली आहेत.

निर्यातक्षम जंबो द्राक्षाला सध्या प्रतवारीनुसार शंभर ते एकशे वीस रुपये, तर दुय्यम दर्जाच्या द्राक्षाला पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे यांनी दिली.

हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात पावसाचा अंदाज दिला होता. यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी या वर्षी छाटणीच्या वेळापत्रकात बदल केल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात आगाऊ छाटणी न करता ऑक्‍टोबर महिन्यात छाटणी केली होती. आगाऊ सप्टेंबर महिन्यात छाटणी केलेल्या जंबो व शरद सिडलेस द्राक्षाचा तोडणी हंगाम सध्या सुरू आहे. ऑक्‍टोबर छाटणीचा तोडणी हंगाम एक फेब्रुवारीपासून सुरू होईल. पंधरा दिवसापूर्वी निर्यातक्षम जंबो द्राक्षाला प्रती किलो एकशे चाळीस रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. मागील दोन दिवसांपासून बाजारभावात घट झाली आहे, अशी माहिती जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष हरिभाऊ वायकर यांनी दिली.

कृषी विभागाकडे तालुक्‍यातील ८१० निर्यातदार शेतकऱ्यांनी ५८९ हेक्‍टर क्षेत्रातील द्राक्षाची नोंदणी केली आहे. या वर्षी वाढलेल्या थंडीमुळे साखर तयार होणे व फुगवण यावर परिणाम झाला होता. मात्र, आता तापमानात वाढ झाल्याने द्राक्ष उत्पादकांसमोरील अडचणी दूर झाल्या आहेत. सद्यःस्थिती पाहता या वर्षी तालुक्‍यात निर्यातक्षम द्राक्षाचे विक्रमी उत्पादन निघणार आहे. व्यापारातील फसवणूक टाळण्यासाठी उत्पादकांनी उधारीवर द्राक्षाची विक्री करू नये.
- बापू रोकडे, कृषी अधिकारी 

  राज्यात जंबो जातीच्या द्राक्षाचे सर्वाधिक उत्पादन जुन्नर तालुक्‍यात
  जुन्नर तालुक्‍यात द्राक्ष लागवडीखाली सुमारे चार हजार एकर क्षेत्र 
  मागील वर्षभरात सुमारे साठ एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड झाली
  शेतकऱ्यांकडून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाला प्राधान्य
  यंदा थंडीमुळे काढणी हंगाम दहा ते पंधरा दिवसांनी लांबला
  एकरी पाच ते सात टन निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन

दीड एकरात नऊ लाख रुपयांचे उत्पन्न
नारायणवाडी येथील द्राक्ष उत्पादक शिवाजी तोडकरी यांनी प्रतिकूल हवामानाचा विचार न करता सप्टेंबर महिन्यात जंबो द्राक्षाची अगाऊ छाटणी केली होती. दीड एकर क्षेत्रात सहा टन निर्यातक्षम व दोन टन दुय्यम द्राक्षाचे उत्पादन निघाले. निर्यातक्षम सहा टन द्राक्षाला प्रतिकिलो १२५ रुपये भाव मिळाला. द्राक्ष विक्रीतून सुमारे नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com