पुण्यात बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू? अहवाल आला समोर

रवींद्र पाटे
Tuesday, 26 January 2021

एका देशी कुक्कुटपालन फार्म मधील 700 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, आता मृत झालेल्या कोंबड्याचा बर्ड फ्लू निदान तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

नारायणगाव - येडगाव(ता.जुन्नर) येथील गणेशनगर शिवारातील एका देशी कुक्कुटपालन फार्म मधील 700 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, आता मृत झालेल्या कोंबड्याचा बर्ड फ्लू निदान तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. सायंकाळी साडेसहा वाजता भोपळा येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोगनिदान प्रयोगशाळेकडून हा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. या मुळे तालुक्यातील  बर्ड फ्लू बाबतची चिंता तूर्त दूर झाली आहे.अशी माहिती जुन्नर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एम.ए. शेजाळ यांनी दिली.

याबाबत डॉक्टर शेजाळ म्हणाले गणेशनगर शिवारातील देशी कुक्कुटपालन फार्म मधील दोन हजार देशी कोंबड्या पैकी सुमारे सातशे कोंबड्या मृत झाल्या होत्या.बर्ड फ्लूच्या संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचा रोग निदान अहवाल प्राप्त होई पर्यंत येडगाव शिवारातील दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर रविवार(ता.२४) पासून सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले होते. या मुळे कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडी खत, पक्षी खाद्य व अनुषंगिक साहित्य, उपकरणे आदींची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली होती. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बर्ड फ्लूबाबत निदान करण्यासाठी मृत कोंबड्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोगनिदान प्रयोगशाळेत पाठवले होते. कोंबड्या मृत झाल्याने तालुक्यातील सुमारे वीस लाख देशी व इंग्लिश कोंबड्या व पिल्लाचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिक चिंतेत होते.

हे वाचा - येरवडा 'तुरुंग' न राहता 'संस्कार केंद्र' बनवू; जेल पर्यटनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे तालुक्यातील कुक्कुटपालन व्यावसायिकांमधील चिंता तूर्त दूर झाली आहे. येडगाव येथील देशी कोंबड्याचा मृत्यू मानमोडी किंवा इतर आजाराने झाला असल्याची शक्यता आहे. मृत कोंबड्याचे शवविच्छेदन करून याबाबत शोध घेऊन पुढील उपचार केले जातील अशी माहिती डॉक्टर शेजाळ यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: junnar poltry farm bird flue report negative says doctor