लेण्याद्रीत आढळला सातवाहनकालीन दगडी पाटा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

जुन्नर - लेण्याद्री-गोळेगाव परिसरात भटकंती करत असताना एका घराजवळ चार पाय असलेला आयत आकाराचा सातवाहनकालीन दुर्मिळ दगडी पाटा इतिहासाचे अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांना आढळला आहे.

जुन्नर - लेण्याद्री-गोळेगाव परिसरात भटकंती करत असताना एका घराजवळ चार पाय असलेला आयत आकाराचा सातवाहनकालीन दुर्मिळ दगडी पाटा इतिहासाचे अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांना आढळला आहे.

याबाबत माहिती देताना ताम्हाणे म्हणाले, ‘‘हा पाटा एकसंघ दगडातून कोरून काढला असून, त्याला चार पाय आहेत. या पाट्यावर वरील बाजूस एका ओळीत सहा बौद्धधर्मीय चिन्हे कोरलेली आहेत. या चिन्हात स्वस्तिक, त्रिरत्न, नंदीपाद व श्रीवत्स ही चिन्हे दिसत आहेत. बौद्ध धर्म व संघ या बौद्धधर्मीयांच्या महत्त्वाच्या व पवित्र घटकांचा निर्देश हा त्रिरत्न चिन्हाद्वारे केला जात असे. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी त्रिरत्नाचे आचरण आवश्‍यक मानले जात असे. 

सम्यकदर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र ही ती रत्ने होत. दगडी पाट्यावरील स्वस्तिकामध्ये चार रेषा असून, त्यांचा आकार सारखा आहे. या रेषांचा अर्थ पूर्व, पश्‍चिम, दक्षिण व उत्तर या दिशा स्वस्तिकाकडून प्रेरीत होतात म्हणून बौद्ध धर्मात स्वस्तिक हे भाग्याचे प्रतीक समजले जाते. लेण्याद्री व अंबा अंबिका येथील बौद्ध चैत्यगृहात कोरलेली ब्राह्मी लिपीतील शिलालेखाच्या अगोदर कोरलेली चिन्हे व दगडी पाट्यावरील चिन्हे एकच असल्याचे दिसून येते. यावरून जुन्नर परिसरात चैत्यगृहाचे काम सुरू असताना अशा प्रकारचे पाटेही निर्माण करण्यात आले असावेत. या पाट्याच्या खाली थाळी ठेवली तर पाट्यावरील पदार्थ हा जमिनीवर न पडता थाळीत पडतो. अशाप्रकारे पाटे नेवासे, पैठण, नाशिक, जुन्नर या गावांतील दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहन काळातील लोकवस्तीच्या ठिकाणी मिळाले आहेत. 

जुन्नर परिसरात इसवी सनाच्या सुरवातीच्या एक दोन शतकांत धान्य दळण्याची जाती प्रचलित झाली. त्यापूर्वी भिजवलेले धान्य या दगडी पाट्यावर वाटून त्यापासून जाडीभरडी भाकरी केली जात होती. रोमन साम्राज्याशी नाणेघाटमार्गे व्यापार सुरू झाल्यानंतर जुन्नर परिसरातील नागरी जीवनात समृद्धी आली. नवीन सुखसोई मिळाल्याचे ताम्हाणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: junnar pune news old stone