जुन्नरला नवागतांची बैलगाडी आणि घोडयावरून मिरवणूक

school-first-day
school-first-day

जुन्नर - दत्ता म्हसकर शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल असलेल्या जुन्नर तालुक्यात आज शुक्रवारी ता.15 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन शैक्षणिक वर्षाची दमदार सुरुवात झाली. तालुक्याच्या सभापती ललिता चव्हाण आणि गटशिक्षणाधिकारी के डी भुजबळ यांनी इनामवाडी, धोंडकरवाडी या ठिकाणी तर उपसभापती उदय भोपे यांनी आगर, गोळेगाव या ठिकाणी भेट देऊन शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला.

जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके यानी देखील शाळांना भेटी देऊन नवागत मुलांचे स्वागत केले. पाठयपुस्तकांचे वितरण त्यांचे हस्ते मुलांना करण्यात आले. गटविकास अधिकारी सतीश गाढवे यानी शिरोली खुर्दला प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभाग घेत मार्गदर्शन केले. सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आजच्या नवागतांचे स्वागत आणि प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभागी झाले होते.
नारायणगाव या ठिकाणी वारूळवाडी केंद्रातील शाळांनी सामुहिकरित्या सहभाग घेऊन मुलांची घोड्यावरून जंगी मिरवणूक काढून ढोल ताश्याच्या गजरात स्वागत केले. यामध्ये सर्व स्थानिक पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.

पूर्व भागातील गव्हाळी या ठिकणी मुलांची सजविलेल्या बैल गाडीतून जंगी मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थ, पालक ,शिक्षक आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यात अत्यंत उत्साहाचे वातावरण आढळून आले.काळवाडी या ठिकाणी देखील मुलांनी आकर्षक फेटे बांधून आणि फुगे हातात घेऊन नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत केले.

जुन्नर तालुक्यात आज सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मुलांना गोड जेवणही देण्यात आले. नवीन पुस्तके आणि नवीन शिक्षक यामुळे मुलांचा आनंद आणखीनच द्विगुणीत झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत होते.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असल्या तरी आज जुन्नर तालुक्यात कोणतीही शाळा शिक्षकाअभावी बंद नव्हती. सर्व शाळांत शिक्षक उपस्थित होते असे के.डी.भुजबळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com