जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला गारांचा तडाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Junnar Tahsil Hail Storm

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव सावा, पारगाव, शिरोली, हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद भागात आज दुपारी गारांचा वर्षाव झाला. निमगाव सावा भागांत शेतात अक्षरशः गारांचा खच पडला.

Junnar Hail : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला गारांचा तडाखा

नारायणगाव - जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव सावा, पारगाव, शिरोली, हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद भागात आज दुपारी गारांचा वर्षाव झाला. निमगाव सावा भागांत शेतात अक्षरशः गारांचा खच पडला होता. काही गारा लिंबाच्या आकाराच्या होत्या. गारांच्या तडाख्यामुळे या भागातील काढणीस तयार असलेल्या गहू, कांदा, डाळिंब, कलिंगड, आंबा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. नारायणगाव परिसरात पाऊस झाला मात्र सुदैवाने गारा झाल्या नाहीत. पावसामुळे नारायणगाव परिसरात निर्यातक्षम द्राक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. अशी मागणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी केली आहे.

जुन्नर तालुक्यामध्ये ११ मार्चपासून पावसाळी वातावरण आहे. मागील चार दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाही. मात्र आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निमगाव सावा, पारगाव, शिरोली, हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद भागात गारांचा पाऊस झाला. निमगाव सावा भागामध्ये गारांचे प्रमाण जास्त होते. शेतामध्ये अक्षरशः गारांचा खच पडला होता.

गारांच्या तडाख्यामुळे काढणीस आलेला गहू, कांदा, डाळिंब, कलिंगड या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारामुळे कलमी आंब्यांना लागलेला मोहर व लहान फळे खाली गळून पडली. हिवरे तर्फे नारायणगावच्या दक्षिण भागामध्ये गारा पडल्यामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नारायणगाव परिसरामध्ये गारा झाल्या नाहीत मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. या भागात द्राक्ष काढणीचा हंगाम भरात असून, पावसामुळे द्राक्षांची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता आहे. मागील सलग तीन वर्ष द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. या वर्षी द्राक्षाला भाव चांगला मिळाला आहे. मात्र पाऊस झाल्याने काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांचे नुकसान होणार आहे. कांदा पिकाप्रमाणे नुकसान झालेल्या द्राक्षाअनुदान मिळावे. अशी मागणी द्राक्ष उत्पादक अवधूत बारवे यांनी केली आहे.

संदीप पवार (निमगाव सावा) - सहा एकर कलिंगड पुढील आठ दिवसांत काढणीस तयार झाली असती. मात्र आज झालेल्या गारपिटीने कलिंगड फळांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

रवींद्र सबनीस (तहसीलदार जुन्नर) - पंचनामा करण्याचे आदेश अद्याप प्राप्त झाले नाहीत मात्र गारपीट झालेल्या भागाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.शासनाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.