जुन्नरमध्ये दुष्काळी झळा तीव्र (व्हिडिओ)

पेमदरा (ता. जुन्नर) ः पाण्याअभावी वाळून चाललेले चारा पीक
पेमदरा (ता. जुन्नर) ः पाण्याअभावी वाळून चाललेले चारा पीक

जुन्नर (पुणे) : भौगोलिकदृष्ट्या तीन भागात विभागल्या गेलेल्या जुन्नर तालुक्‍याचे पर्जन्यमानदेखील असेच विभागलेले पाहायला मिळते. पश्‍चिम आदिवासी भागात जास्त तर मध्यभागात बऱ्यापैकी तर पूर्वभागात अत्यंत कमी अशा उतरत्या श्रेणीने दरवर्षी पाऊस होत असतो. या वर्षीहीदेखील असेच चित्र आहे. तालुक्‍यातील महसुलाच्या नऊ मंडल विभागातील पर्जन्यमापकावर नोंदविलेल्या पावसाच्या आकडेवारीच्या आधारे तालुक्‍यात सरासरीच्या 104.66 टक्के पाऊस झाल्याने सरकारच्या दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत जुन्नरचे नाव आले नाही.

या वेळी सरकारने दुष्काळाचे निकष बदलून उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केले असले तरी पावसाच्या प्रमाणाचा निकषही लावला आहे. जुन्नर तालुक्‍याची पावसाची सरासरी 750 मिलिमीटर असून, या वर्षी 785.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती नसल्याचे समजून तालुक्‍याला यादीतून वगळले गेले आहे. येडगाव, वडज, माणिकडोह, पिंपळगावजोगा, चिल्हेवाडी या पाच धरणांबरोबर अनेक कोल्हापुरी बंधारे, पाणी साठवण तलाव तालुक्‍यात असताना ऑक्‍टोबरच्या सुरवातीलाच पूर्व भागातील शिंदेवाडी, पेमदरा या दोन गावांसह परिसरातील वाड्याची टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी झाल्याने तालुक्‍याचे नाव दुष्काळी यादीत नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

तालुक्‍याला संभाव्य दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार असल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाने आतापासून तयारीला लागण्याची गरज आहे. आमदार शरद सोनवणे व अधिकारी वर्गाने पूर्व भागाचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतली आहे. पश्‍चिम आदिवासी भागाचा दौरा होणार आहे. 15 नोव्हेंबरला पिकाची आणेवारी जाहीर होईल. या वेळी गावनिहाय योग्य आणेवारी लागणे गरजेचे आहे. यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पीक पाण्याचा परिस्थितीनुसार तालुक्‍याला दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली करणे भाग पडेल, असे चित्र आहे.

जुन्नर तालुक्‍यातील पावसाची आकडेवारी (मिलिमीटरमध्ये)
मंडळ - पडलेला पाऊस - टक्के - पावसाचे दिवस

जुन्नर - 458 - 276.6 - 38
नारायणगाव - 285 - 204.1 - 30
वडगावआनंद - 153 - 86.1 - 12
निमगावसावा - 400 - 324.2 - 26
बेल्हे - 472 - 396.2 - 27
राजूर - 2525 - 1461 - 64
डिंगोरे- 1147 - 683.6 - 60
आपटाळे- 1221 - 668.3 - 52
ओतूर - 405 - 294.6 - 35
एकूण - 785.5 - 104.66 - 66

वडगाव आनंद मंडळात कमी पाऊस
जुन्नर तालुक्‍यात जून ते सप्टेंबरअखेर चार महिन्यांत 66 दिवस पावसाचे असले तरी हा पाऊस प्रामुख्याने राजूर, डिंगोरे, आपटाळे या आदिवासी भागातील मंडळात झाला आहे. वडज, माणिकडोह व पिंपळगावजोगा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक दिसत आहे. सर्वांत कमी पाऊस वडगाव आनंद मंडळ विभागात नोंदला गेला आहे. सर्वाधिक राजूरला येथे झाला आहे.

खरीप उत्पन्नात घट, रब्बी धोक्‍यात
परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांच्या उत्पादनात 40 ते 50 टक्के घट आली आहे. आदिवासी भागातील भातपीक जळून गेले आहे. यामुळे वर्षभराच्या उदरनिर्वाह करण्याचे हातातोंडाशी आलेले साधनच आदिवासी शेतकऱ्यांचा हातून निघून गेले आहे. आता वर्षभर आर्थिक घडी कशी बसवायची असा प्रश्न पडला आहे. खरीप हंगामाची अशी स्थिती असताना पावसाअभावी रब्बी हंगामदेखील धोक्‍यात आला आहे. पूर्व भागात रब्बीच्या पेरण्या वाया गेल्या असून, पाणी आणि चारा या दोन्ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. चारा व पाण्याअभावी काहींनी आपली जनावरे इतरत्र पाठविण्याची तयारी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com