ज्योती कुमारीच्या मारेकऱ्यांना फाशीऐवजी जन्मठेप; 35 वर्ष तुरुंगवास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

पुणे : बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरी हिच्यावर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅब चालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

पुणे : बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरी हिच्यावर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅब चालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता दोघांना 35 वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे. बचाव पक्षाचे वकील युग चौधरी यांनी या वृत्तास दुजोरा दिला. 

कॅब चालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकडे यांना 24 जूनला फाशी देण्यात येणार होती. मात्र शिक्षेला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने स्थगितीचा आदेश दिला होता. 22 वर्षीय ज्योती कुमारी हिचा 1 नोव्हेंबर 2007 रोजी नोकरीच शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी दोन्ही नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून खून केला. या प्रकरणी सत्र न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींना मार्च 2012 मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली होती. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे दोघांनी मे 2017 मध्ये राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला होता. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तो अर्ज जून 2017 मध्ये फेटाळला. त्यामुळे बोराटे आणि कोकडे यांच्या फाशीच्या शिक्षेचे वॉरंट 10 जून रोजी पुणे सत्र न्यायालयाने काढले होते. 

दया याचिका फेटाळल्यानंतर शिक्षेची अंमलबजावणीस कारागृह प्रशासनाने चार वर्षाचा कालावधी लावला. त्यामुळे फाशीच्या शिक्षेचे वॉरंट कधीही येऊ शकते, असा विचार करत बोराटे व काकडे चार वर्षे सतत मृत्यूच्या छायेत जगले. ही बाब जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणारे असल्याचे दोघांनी केलेल्या याचिकेत नमूद केले होते. गृहविभाग आणि कारागृह प्रशासनाने हा विलंब केल्याचा युक्तिवाद ऍड. चौधरी यांनी केला. या प्रकरणात सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी युक्तिवाद केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jyoti Kumari murderers given life imprisonment instead of death