मुंबईत जाऊन आमदार झालेल्या दौंडच्या थोरातांची तिसरी पिढी राजकारणात

रमेश वत्रे
Tuesday, 5 January 2021

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. भाकरीची भ्रांत असणाऱ्या अनेक तरूणांनी या मुंबापुरीत येऊन आपले नशीब आजमावले. पैसा आणि नाव कमवीत आपले संसार थाटले. काकासाहेब याला अपवाद आहेत.

केडगाव(पुणे): दौंड तालुक्यातील माजी आमदार काकासाहेब थोरात यांच्या तिसऱ्या पिढीने आज राजकारणात प्रवेश केला. त्यांचे नातू अभिषेक आनंद थोरात यांची आज ग्रामपंचायत बोरीपार्धीच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. भाकरीची भ्रांत असणऱ्या अनेक तरूणांनी या मुंबापुरीत येऊन आपले नशीब आजमावले. पैसा आणि नाव कमवीत आपले संसार थाटले. काकासाहेब याला अपवाद आहेत. काकासाहेब यांनी १९४४ मध्ये पोटासाठी मुंबईची वाट धरली. आपला प्रपंच सावरता सावरता त्यांनी हजारो कामगारांचे संसार उभे केले. अन्यायपिडीत व शोषित कामगारांना ताठ मानेने जगायला शिकवले. कामगारांच्या बरोबरीने काम करताना त्यांची दुःखे जवळून पाहिली. मुंबईतील भांडवलदारांशी त्यांनी लढा दिला. मुंबईतील माथाडी कामगारांचा लढा म्हणजे 'अण्णासाहेब ( पाटील )  यांची शक्ती व काकासाहेब यांची युक्ती' असाच होता.

१९६१ मध्ये काकासाहेब यांनी वाडीबंदर कामगार सोसायटीची स्थापना केली. बघता बघता हा कामगार कार्यकर्ता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, स.का.पाटील, अण्णासाहेब पाटील यांचा विश्वासू सहकारी बनला. १९७८ साली वसंतदादा यांनी त्यांना दौंड तालुक्यातून विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसने त्यांना १९८५ ला मुंबईतील कुर्ला-नेहरूनगर मतदार संघातून पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांना कामगारांनी भरभरून मतदान दिले. विधानसभेची निवडणूक जिंकण्याआधी व नंतर काकासाहेब यांनी कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. काही माणसांच्या बाबतीत शिक्षण हा मुद्दा गौण ठरतो तसा तो काकासाहेब यांच्या बाबतीतही गौण ठरला. काकासाहेब यांनी जगातील पहिले सहकारी तत्वावरील कंटेनर फ्रेट स्टेशन उभारले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काकासाहेब यांच्या कामावर प्रभावीत होऊन कामगार सहकार सोसायटीला गोदीतील मालाच्या चढ-उतारासाठी मुंबईत १३ एकर जमीन दिली. त्यांनी कामगार कल्याणासाठी आपली हयात घालवली. धनगर समाजाच्या एन.टी. आरक्षणासाठी प्रयत्न केले.

जुन्नरच्या आजींची कमाल! वयाच्या ७२ वर्षी 2 दिवसात 2 किल्ले केले सर 

काकासाहेब यांचा मोठा मुलगा आनंद थोरात यांनी १९९२ साली राजकारणात प्रवेश केला. त्यांनी सुभाष कुल व रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून भीमा पाटस कारखान्याची निवडणूक लढवली. पुढे ते कारखान्याचे उपाध्यक्ष झाले. आनंद यांनी बोरीपार्धी गावचे सरपंचपद भूषविले आहे. स्पष्टवक्ता व पारदर्शी राजकारणासाठी ते तालुक्यात ओळखले जातात. मारून मुटकून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. १९९२ ते २०१९ पर्यंत ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षांशी एकनिष्ठ राहिले. २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सध्या बोरीपार्धी ग्रामपंचायत निवडणूक लागली असून तीत काकासाहेब यांचा नातू अभिषेक याने उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आज अभिषेक याच्यासाठी इतरांनी माघार घेत त्यास बिनविरोध निवडून दिले. उच्चशिक्षित असलेला अभिषेक याची राजकारणातील सुरवात तर चांगली झाली आहे. मात्र त्याचे कामकाज, संघठन, राजकारणावरील पकड कशी राहिल याची तालुक्याला उत्सुकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kakasaheb Thorat third generation enters politics