काळभैरवनाथ यात्रेत फिरते गाडी बगाड पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी

पराग जगताप
सोमवार, 9 एप्रिल 2018

कलाष्टमीला सकाळी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाला 51 ग्रामस्थांनी अभिषेक केला. त्यानंतर मांडव डहाळ्यासह पारंपारिक वाद्यासह लेझीमच्या तालावर पोषाक व पादुकाची गावातून मंदिरापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर भाविकांनी नवसाची शेरणी वाटप केले.

उदापूर ता. जुन्नर - येथे काल ता. 8 रविवारी कालाष्टमी निमीत्त ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व मुक्तादेवीच्या यात्रेत हजारो भाविकांनी देवाचे फिरते गाडी बगाड पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच संदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचं चांगभलं, अंबाबाईचा उदे उदे च्या घोषात तळी भांडार करून मंदिराच्या सभा मंडपातून मुक्तपणे खोबऱ्याची उधळण केली.      

याबाबत श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, ग्रामविकास मंडळ उदापुरचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे व माजी सरपंच बबन कुलवडे म्हणाले की, कलाष्टमीला सकाळी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाला 51 ग्रामस्थांनी अभिषेक केला. त्यानंतर मांडव डहाळ्यासह पारंपारिक वाद्यासह लेझीमच्या तालावर पोषाक व पादुकाची गावातून मंदिरापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर भाविकांनी नवसाची शेरणी वाटप केले. त्यानंतर गावात गाड्यावर बगाड आवळण्याचे काम सुरु झाले. दुपारी चार दरम्यान मारुती मंदीरा पासुन वाजतगाजत दोन बैलजोड्याच्या सहायाने गाडी बगाड मुख्याचौकात पाराजवळ आले. गाडी बगाडाच्या सुळ्याची उंची 21 फुट असून त्यावर असलेल्या आडव्या अड्याची लांबी 40 फुट आहे. आड्याच्या एका टोकाला बाधंलेल्या छोळीत पुजारी बसलेले होता तर आड्याच्या दुसऱ्या बाजुकडील व्यक्तीला व दोराला धरुन भाविकांकडून बगाड फिरवले जाते. बगाड फिरवताना खुपमोठा थरार अनुभवायला मिळतो.

यावेळी गावातील तरुणाई बरोबरच पाहुण्यांचा हि तो अनुभव उत्साह पूर्ण असतो. त्यानंतर गावातून बगाड श्री काळभैरवनाथा मंदीराजवळ आल्या नतंर परत येथेही बागड फिरवले गेले. त्यानंतर पुजारी मंदिरात जाऊन पुजा करुन तळीभंडार केला. तसेच यावेळी भाविक भक्तही मोठ्या प्रमाणात तळीभंडार करुन मंदिराच्या सज्ज्यातून भंडाऱ्याची व खोबऱ्याची मुक्त उधळण केली. रात्री यात्रेकरुंच्या मनोरंजनासाठी छबिना व शोभेची दारू उडवून मोठी आतिषबाजी करण्यात आली व लोकनाट्य तमाशा झाला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Kalbhairav yatra in Junnar