काळेवाडी फाटा-आळंदी बीआरटी मार्ग बदलणार 

रवींद्र जगधने
बुधवार, 16 मे 2018

पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्गात अडथळा ठरणाऱ्या दोन कंपन्यांच्या जागा हस्तांतराचा तिढा कायम असल्याने बीआरटी बस मार्गात बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्गात अडथळा ठरणाऱ्या दोन कंपन्यांच्या जागा हस्तांतराचा तिढा कायम असल्याने बीआरटी बस मार्गात बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

या मार्गावरील पवना नदी, लोहमार्ग व मुंबई-पुणे मार्गावरून गेलेला संत मदर तेरेसा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, एमएम चौक ते पवना नदी पुलापर्यंत काम अद्याप सुरू आहे. आयुक्त बंगल्यासमोरील एमआयडीसी हद्दीतील कंपन्यांची साठ मीटर जागा महापालिकेकडे हस्तांतर झाली नसल्याने या ठिकाणी रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे काळेवाडीवरून येणारी बस ऑटो क्‍लस्टरजवळून डावीकडे वळून पुढे केएसबी चौकातून चिखलीकडे जाईल. तर चिखलीकडून येणारी बस मोरवाडी न्यायालयासमोरून पुढे ऑटो क्‍लस्टरजवळ बीआरटी मार्गातून काळेवाडीकडे जाईल. त्यामुळे आयुक्त बंगल्यासमोरील मार्ग वापराविना पडून राहणार आहे. 2015 पासून आयुक्त, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी व जागा मालक यांच्यात सात बैठका झाल्या. मात्र, अद्याप तोडगा निघाला नसल्याचे महापालिका बीआरटीएस विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी सांगितले. दरम्यान, या मार्गाचे काम 2011पासून सुरू असून, तापकीर चौकात हा मार्ग सुमारे 85 मीटर लांब व 34 मीटर रुंद झाला आहे. तर, कुदळवाडी ते जाधववाडी 24 मीटर रुंद आहे. जाधववाडी ते देहू-आळंदी रस्त्यापर्यंत 30 मीटर रुंद आहे. 

दृष्टिक्षेपात मार्ग 
- लांबी 10.25 किलोमीटर 
- रुंदी 45 मीटर 
- पदपथ : 1.8 मीटर 
- सायकल ट्रॅक : 2.5 मीटर 
- संत मदर तेरेसा उड्डाण पुलाची लांबी : 1.6 मीटर 

कामाचे टप्पे आणि खर्च 
- काळेवाडी फाटा ते एम. एम. विद्यालय : 31.12 कोटी 
- एमएम विद्यालय ते पवना नदी पूल : 25.65 कोटी 
- संत मदर तेरेसा उड्डाण पूल ः 103.52 कोटी 
- ऑटो क्‍लटर ते केएसबी चौक : 48.74 कोटी 
- केएसबी चौक ते देहू- आळंदी रस्ता : 48.45 कोटी 

जागा ताब्यात आल्यानंतर रस्त्याचे काम केले जाईल. त्यानंतर बस मार्ग सुरळीत होईल. तूर्तास बस मार्गात बदल करून ऑगस्टमध्ये बीआरटी बस सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. 
- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटीएस. 

सदर प्रकरण मुंबईतील मुख्य कार्यालयात सुरू असून, याबाबत सविस्तर माहिती मुख्य कार्यालयातूनच मिळू शकते. 
- संजीव देशमुख, क्षेत्रीय अधिकारी, एमआयडीसी 

महापालिका व एमआयडीसीच्या समन्वयाच्या अभावामुळे हा प्रश्‍न प्रलंबित असून, मंत्रालय स्तरावर होणाऱ्या बैठकीमध्ये यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. 
- बी. के. जैन, जागा मालक. 

Web Title: Kalewadi Phata-Alandi BRT route will be changed