काळेवाडी फाट्यावर वाहतुकीचा बट्ट्याबोळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

काळेवाडी - औंध-किवळे बीआरटी मार्गावरील काळेवाडी फाटा येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकाला अतिक्रमणांनी वेढले आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे चौक ओलांडणे नागरिकांसाठी जीवघेणे झाले असून, वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. याकडे महापालिका व पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.

काळेवाडी - औंध-किवळे बीआरटी मार्गावरील काळेवाडी फाटा येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकाला अतिक्रमणांनी वेढले आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे चौक ओलांडणे नागरिकांसाठी जीवघेणे झाले असून, वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. याकडे महापालिका व पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.

पुणे, शिवाजीनगर ते डांगे चौक, रावेत, किवळे, देहूरोड; तर काळेवाडी, पिंपरी, रहाटणी, थेरगाव ते वाकड, हिंजवडी, बालेवाडी आदी मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक आहे. दररोज हजारो वाहने चौकातून ये-जा करतात. बीआरटी मार्गावर असलेल्या या चौकात महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी उड्डाण पूल आहे. मात्र, बीआरटी मार्ग पुलाखालून गेल्याने कस्पटे वस्ती व काळेवाडीच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांसह नागरिकांना चौक ओलांडताना कसरत करावी लागते. त्यात उड्डाण पुलाचे स्तंभ चौकाच्या मधोमध आल्याने अपघात होतात, चारही मार्गाने धावणारी वाहने नियम पाळत नाहीत. हा चौक अपघाताचे माहेरघर बनला आहे. त्याचबरोबर उड्डाण पुलाखाली व बंद बीआरटी मार्गात अवजड वाहने, मोटारी व रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

पोलिस पावत्या फाडण्यात मग्न

एकीकडे वाहनचालक सिग्नलचे नियम पाळत नाहीत; तर दुसरीकडे पोलिस मात्र वाहतूक नियमनाऐवजी पावत्या फाडण्यात मग्न असतात.   

रिक्षाचालकांवर कारवाई नाहीच
चौकाच्या चारही दिशेला अनधिकृत व बेशिस्त सहा व तीनआसनी रिक्षा उभ्या राहात असल्याने वाहतुकीस अडथळा होतो. पोलिस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही. 

पदपथ गायब
या चौकातून डांगे चौकाच्या दिशेस दोन्ही बाजूंना हातगाड्या व दुकानदारांनी अतिक्रमण करून पदपथ गिळंकृत केले आहेत. एका खासगी हॉस्पिटलची पार्किंगही पदपथावर आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. भुयारी पादचारी मार्गात दुचाकी उभ्या केल्या जातात.  

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी एका ठिकाणी थांबून पावत्या फाडण्यापेक्षा वाहतूक सुरळीत होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहावे.
- विकास एकशिंगे, रहाटणी.  

बीआरटी रखडल्यामुळे वाहतूक समस्या वाढली आहे. येथे बऱ्याच वेळा वाहतूक पोलिस नसतात. वाहनचालक वॉर्डनकडे दुर्लक्ष करून सिग्नल तोडतात. 
- काशिनाथ नखाते, काळेवाडी.

काय करायला हवे 
    अतिक्रमणे हटवून पदपथ मोकळे करावेत 
    कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नेमावेत
    सिग्नल यंत्रणेचे सुसूत्रीकरण हवे
    पादचाऱ्यांना चौक ओलांडण्यासाठी सुविधा
    बेशिस्त रिक्षाचालक व पुलाखाली थांबणाऱ्या वाहनांवर कारवाई

Web Title: Kalewadi traffic issue