...अन्‌ कळकराई पुन्हा प्रकाशले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

पुणे - आंदर मावळातील कळकराई हे एक गाव... सह्याद्रीच्या डोगरांनी वेढलेले ... सुमारे दीड किलोमीटर खोल व अरुंद दरीत असणाऱ्या वीजवाहक तारा वादळी पावसामुळे तुटल्या अन्‌ या गावाचा वीजपुरवठा खंडित झाला. परंतु, महावितरणचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व धाडसी तरुणांनी एकत्र येत खोल दरीत उतरून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यामुळे कळकराई गाव पुन्हा प्रकाशले.

पुणे - आंदर मावळातील कळकराई हे एक गाव... सह्याद्रीच्या डोगरांनी वेढलेले ... सुमारे दीड किलोमीटर खोल व अरुंद दरीत असणाऱ्या वीजवाहक तारा वादळी पावसामुळे तुटल्या अन्‌ या गावाचा वीजपुरवठा खंडित झाला. परंतु, महावितरणचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व धाडसी तरुणांनी एकत्र येत खोल दरीत उतरून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यामुळे कळकराई गाव पुन्हा प्रकाशले.

मावळ तालुक्‍यातील कळकराई गाव हे खेड, मावळ व कर्जत तालुक्‍यांच्या सीमेवर आहे. कळकराईजवळील सावळा गावापर्यंत डांबरी रस्ता आहे. त्यापुढे सुमारे साडेतीन किलोमीटर डोंगराला वळसा घालत, धबधब्यांचे वेगवान प्रवाह ओलांडून जंगलातील अत्यंत खडतर पायवाटेने डोंगर पायथ्याशी असलेल्या ७० घरांच्या कळकराई गावात जाता येते. २००५ मध्ये कळकराई गावाजवळील डोंगरमाथ्यावर वीजयंत्रणेसह रोहित्र उभारण्यात आले व त्यास महावितरणच्या तळेगाव उपकेंद्रातून २२ केव्ही वाहिनीद्वारे वीज देण्यात आली. या रोहित्रापासून सुमारे दीड किलोमीटर अरुंद दरीमध्ये ५ ते ६ किलोमीटर लांबीच्या वीजतारा टाकून कळकराई गावाला वीजपुरवठा सुरू आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात वादळामुळे दरीत असलेल्या वीजतारा तुटल्या अन्‌ कळकराई गावाचा वीजपुरवठा खंडित झाला. डोंगरावरील रोहित्रापासून ते पायथ्याशी असलेल्या कळकराई गावापर्यंत नवीन वीजतारा टाकणे आवश्‍यक होते. संततधार पाऊस असल्याने निसरड्या दरीत उतरणे शक्‍य झाले नाही. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्याही परिस्थितीत प्रयत्न केला, पण दुरुस्ती करणे शक्‍य झाले नाही.

कळकराई गावात महावितरणचे ५५ वीजग्राहक आहेत. विशेष म्हणजे ते नियमित वीजबिल भरणारे आहेत.  या प्रामाणिक वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणकडून निसर्गाशी झुंज देत प्रयत्न सुरू झाले. नवीन वीजतारा व दुरुस्तीचे साहित्य डोंगराळ पायवाटेने नेण्यासाठीच सुमारे ४ ते ५ दिवस लागले. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना सहकार्याचे आवाहन केले. त्यानंतर महावितरणचे प्रशिक्षित कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व ठाकर समाजातील धाडसी तरुण आदी सुमारे ३० ते ३५ जणांच्या पथकाने डोंगरमाथ्यावरून, खोल दरीतून कळकराईपर्यंत वीजतारा ओढण्याचे काम सुरू केले. दुरुस्ती कामासाठी ५ दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर सुरळीत वीजपुरवठ्याने कळकराई गाव पुन्हा प्रकाशले अन्‌ ग्रामस्थांचे चेहरेसुद्धा आनंदाने उजळले.

Web Title: kalkarai electricity light