काळेवाडी पोलिस चौकी अडकली समस्येच्या गर्तेत

रवींद्र जगधने
रविवार, 13 मे 2018

"काळेवाडी चौकी स्थलांतराचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र, चौकीच्या सुविधांचा विचार करता तिचे स्थलांतर होणे गरजेचे आहे.'' 
- सतीश माने, वरिष्ठ निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे 

पिंपरी (पुणे) : काळेवाडी पोलिस चौकीत मुबलक जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, टेलिफोन, स्वच्छतागृहसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चौकी समस्येच्या गर्तेत आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. 

वाकड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या चौकीचे काम गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून एका दहा बाय दहाच्या गाळ्यात सुरू आहे. गाळ्याला खिडकी नाही, बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. सहायक पोलिस निरीक्षक दोन, उपनिरीक्षक एक व सात पोलिस कर्मचारी असा कर्मचारी वर्ग चौकीत कार्यरत आहे. काळेवाडी व रहाटणी परिसरातील दररोजच्या दहा ते पंधरा विविध तक्रारी चौकीत दाखल होतात. त्यामुळे मोठी गर्दी असते. कारवाई केलेली वाहने, कर्मचारी व फिर्यादी यांच्यासह पोलिस व्हॅनही मुख्य रस्त्यावर थांबविलेली असते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. महिला स्वच्छतागृहाची स्वतंत्र्य सुविधा नाही. चौकीत कागदपत्रे व महत्त्वाचे दस्तावेज ठेवण्यासाठी जागा नाही. टेलिफोनची सुविधा नाही. एमएम महाविद्यालयाच्या बाजूला चार गुंठे जागा पोलिस चौकीसाठी मंजूर असून, तेथे चौकी स्थलांतरित झाल्यास रहाटणीतील नागरिकांना ती दूर होईल. 

"काळेवाडी चौकी स्थलांतराचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र, चौकीच्या सुविधांचा विचार करता तिचे स्थलांतर होणे गरजेचे आहे.'' 
- सतीश माने, वरिष्ठ निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे 

Web Title: kalwadi police chowki issue in Pimpri