दानशूरांकडून कचऱ्यासाठी जागा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

कामशेत - येथे कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा नव्हती. त्यामुळे आठवडे बाजार बंद करण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली होती. या पार्श्‍वभूमीवर काही दानशूर नागरिकांनी जागा दिल्याने शहरातील कचऱ्याची समस्या मार्गी लागली असून, आठवडे बाजारही सुरळीत सुरू झाला आहे.

कामशेत - येथे कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा नव्हती. त्यामुळे आठवडे बाजार बंद करण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली होती. या पार्श्‍वभूमीवर काही दानशूर नागरिकांनी जागा दिल्याने शहरातील कचऱ्याची समस्या मार्गी लागली असून, आठवडे बाजारही सुरळीत सुरू झाला आहे.

सकाळमध्ये १२ डिसेंबरला या संदर्भातील सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. जुन्या खामशेत येथील कचरा डेपोचा प्रश्न न्यायालयात गेल्याने महिनाभरापासून शहरातील कचरा टाकण्यास जागा नव्हती. २० ते २५ टन कचरा जागोजागी शहरात पडून राहिल्याने दुर्गंधी पसरली होती. डासांचा फैलाव झाला. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत शहरात कचरा कमी करावा, यासाठी व्यापारी, लायन्स क्‍लब व ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन जनजागृती फेरीही काढली. याबाबत सकाळमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रोहिदास वाळुंज व अन्य जणांनी पुढाकार घेतला. कचरा टाकण्यास जागा उपलब्ध करून दिली. सरपंच सारिका शिंदे, उपसरपंच काशिनाथ येवले, माजी उपसरपंच गणपत शिंदे, विजय दौंडे यांनी पुढाकार घेतला. जागेबाबत मालकांबरोबर चर्चा केली. शहरातील कचरा उचलण्यास बुधवारपासून (ता. २०) सुरवात झाली आहे.

पर्यायी जागा उपलब्ध
सरपंच सारिका शिंदे, उपसरपंच काशिनाथ येवले म्हणाले, खामशेत येथील जागेचा वाद न्यायालयात सुरू आहे. १९ डिसेंबर ही तारीख होती; परंतु न्यायाधीशांच्या बदल्या झाल्याने १५ जानेवारी ही तारीख पडली. कचऱ्यामुळे शहरात रोगराई पसरू नये, यासाठी आम्ही जागेच्या शोधात होतो. काही दानशूरांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. खामशेत गावातील कचरा डेपोचा निकाल लागेपर्यंत आम्ही दुसरीकडे मिळालेल्या जागेत कचरा टाकण्यास सुरवात केली आहे. आमच्या बाजूनेच निकाल लागेल, त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी कचरा टाकण्यात येईल. सकाळमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कचऱ्याची समस्या मार्गी लागली. त्यामुळे ‘सकाळ’ला मी धन्यवाद देते, असे सरपंच सारिका शिंदे म्हणाल्या.

Web Title: kamshet pune news donate place for garbage