गंगोत्री-गोमुखपर्यंत पदभ्रमंती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

हिमालयातील पहिल्याच मोहिमेतील यशाने कणादच्या कक्षा आणखी रुंदावल्या आहेत, त्यामुळे आमचाही आत्मविश्‍वास वाढला असून, आनंद द्विगुणित झाला आहे. 
- दर्शना व प्रशांत पिंपळनेरकर, कणादचे आई-वडील

सेरेब्रल पाल्सीग्रस्त कणादची २८ किलोमीटर अंतराची चाल
पिंपरी - चिंचवडगाव येथील सेरेब्रल पाल्सीग्रस्त १३ वर्षीय कणाद पिंपळनेरकर याने जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त उत्तराखंडमधील गंगोत्री ते गोमुखपर्यंतची २८ किलोमीटर अंतराची पदभ्रमंती व चंद्रशीला पर्वतावर चढाई केली.

कणादचे वडील प्रशांत पिंपळनेरकर, आई दर्शना आणि मामा विशाल सोनटक्के यांच्यासमवेत त्याने ही कामगिरी केली. गढवाल हिमालयातील गंगोत्री येथील गंगादेवी मंदिरापासून कणाद याने पदभ्रमंतीला सुरवात केली. जेमतेम दोघांना चालता येईल अशी पायवाट, उजव्या बाजूला खळाळत वाहणारी भागीरथी आणि डाव्या बाजूला मान उंच पर्वतांच्या साक्षीने कणादने भोजबासपर्यंतचा १४ किलोमीटरचा प्रवास सुरू केला. गंगोत्रीनंतरचा पहिला टप्पा नऊ किलोमीटरवरील चीडबास येथे होता. इथपर्यंतच्या वाटेत विविध पक्षी, भोजपत्र आणि देवदारचे वृक्ष, रानफुले, सरीसृप, मधूनच दिसणारे हिमाच्छादित पर्वत, गंगोत्रीचे थक्क करणारी विहंगम खोरे आणि थंडगार वातावरणात हवाहवासा वाटणारा सूर्यप्रकाश अशा वातावरणाचा कणादने अनुभव घेतला. हा टप्पा पार करण्यास कणादला पाच तासांचा कालावधी लागला. चीडबासपासून भोजबासपर्यंतचा प्रवास आव्हानात्मक राहिला. हा टप्पा भूस्खलनप्रवण क्षेत्रात येतो. रक्तवर्ण ग्लेशियरच्या पट्ट्यात अतिथंड वातावरणाचा सामना कणादला करावा लागला. इथून पुढे झाडी विरळ होऊन गवताळ प्रदेशाला सुरवात झाली. हिमालयातील भरल नावाचा प्राणी तेथे कळपाने चरण्यास येत असल्याने त्यांच्या हालचालींमुळे उंचावरून दगड पडण्याची शक्‍यता वाढते, त्यामुळे त्याने जलदगतीने हा प्रदेश पार करण्याचे आव्हान पूर्ण केले. अखेर सर्व प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात कणादने सायंकाळी भोजबास गाठले. भोजबासपासून पुढे गोमुखपर्यंतच्या चार किलोमीटरच्या टप्प्यावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याचे समजल्याने कणाद आणि त्याच्या आई-वडिलांनी गंगोत्रीला परतण्याचा निर्णय घेतला.

चंद्रशीला पर्वतावर चढाई
केदारनाथ ते बद्रीनाथपर्यंतच्या रस्त्यावरील चोपता येथील १३ हजार फूट उंचीच्या चंद्रशीला पर्वतावरदेखील कणादने यशस्वी चढाई केली. त्याच्या माथ्यावरील मंदिरातील गंगामातेचे दर्शन घेऊन त्याने तिरंगा फडकविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kanad Pimpalnerkar gangotro to gomukh success