पिंपरी - ‘जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आणि कांचनजुंगा शिखर यांच्यात खरे तर तुलना होऊ शकत नाही. परंतु, एव्हरेस्टपेक्षा तांत्रिकदृष्ट्या कांचनजुंगा दहा पटीने अवघड ठरले. मला ‘कांचनजुंगा’चे पूर्वीपासूनच आकर्षण होते. त्याच्या माथ्यावर पाऊल ठेवल्यावर एव्हरेस्ट, लोत्से, मकालू यांसारख्या शिखरांचे विलोभनीय दर्शन झाले. माझे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले,’’ अशा शब्दांत गिर्यारोहक कृष्णा ढोकले यांनी भावना व्यक्त केली.
पुण्यातील गिरिप्रेमी गिर्यारोहण संस्थेच्या दहा गिर्यारोहकांच्या चमूने जगातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एव्हरेस्ट’पाठोपाठ हिमालयातील भारतातील सर्वांत उंच म्हणून ओळखले जात असलेले आठ हजार ५८६ मीटर उंचीचे कांचनजुंगा शिखर सर केले. या दोन्ही मोहिमांमध्ये पूर्णानगर येथील गिर्यारोहक कृष्णा ढोकले यांचाही समावेश होता.
ढोकले म्हणाले, ‘‘राज्यातून यापूर्वी १९८८ मध्ये कांचनजुंगा शिखर सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. मात्र, कोणत्याही गिर्यारोहकाने वैयक्तिक किंवा समूहाने हे शिखर सर केले नव्हते. हिमालयातील आठ हजार मीटर उंचीवर (अष्टहजारी) चौदा शिखरे असून, त्यात कांचनजुंगाची अंतिम चढाई लांब पल्ल्याची अतिकठीण श्रेणीत मोडते. खिळ्यांचे बूट घालून खडकाळ भागांमधून चालणे कठीण ठरते. शेवटच्या टप्प्यातील अंतर पूर्ण करण्यास २६ तासांपेक्षा जास्त कालावधी लागतो. त्यामुळे अनेक गिर्यारोहक कांचनजुंगा सर करण्यात अपयशी ठरतात. ऑक्सिजनही मर्यादित प्रमाणात राहत असल्याने गिर्यारोहकाचा मृत्यूही ओढावू शकतो.’’
ढोकले म्हणाले, ‘‘हवामानाशी मिळते जुळते घेतल्यावर चढाईला सुरवात झाली. कॅम्प-१ ते कॅम्प-२ च्या दरम्यान छोट्या-मोठ्या दरडी कोसळत होत्या. त्यामुळे खराब हवामानामुळे कॅम्प-२ वर रात्रीचे दोन मुक्काम करावे लागले. सर्वात शेवटचा टप्पा अवघड ठरला. तेथील १३०० मीटर अंतर पूर्ण करण्यास १९ तास लागले.’’
‘कांचनजुंगा’चा बेस कॅम्प पाच हजार चारशे मीटर उंचीवर असून, तेथून पुढे कॅम्प-१ (६,२००मीटर), कॅम्प-२ (६,३०० मीटर), कॅम्प-३ (६,९०० मीटर), कॅम्प-४ (७,३०० मीटर) आणि शिखर माथा असे चढाईचे टप्पे आहेत. पिंपरीतील हाफकीन जीवऔषध निर्माण महामंडळामध्ये ढोकले हे काम करीत असून, पिंपरी-चिंचवड माउंटनिअरिंग क्लबचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.