करंदीच्या माळरानावर त्यांनी पेरला पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

देशी वृक्षांच्या बियांचा वापर
सीडबॉल तयार करण्यासाठी शमी, बेहडा, पुत्रजिवा, बिब्बा, पिंपळ अशा देशी वृक्षांच्या बियांचा वापर करण्यात आला आहे. हरीत मित्र संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घागरे यांनी बिया पुरवल्या.

पुणे - आसमंत हिरवागार झालेला... पावसाची भुरभुर... लाल वाटा, चरांना वेढणारा ओढा आणि निवांत माळरान, अशा सुखद वातावरणात तनिष्का सदस्यांनी उत्साहाने सीडबॉल मातीत अलगदपणे ठेवले. गेले तीन आठवडे जिद्दीने तयार केलेले तब्बल ७ लाखांहून अधिक सीडबॉल पेरून तनिष्कांनी जणू पाऊसच पेरला.

‘तनिष्का व्यासपीठ’च्या माध्यमातून ‘चला पाऊस पेरूया’ या उपक्रमांतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात जनजागृती आणि सीडबॉल तयार करणे, असे दोन प्रकल्प तनिष्का सदस्यांनी हाती घेतले आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी पुणे शहर-जिल्ह्यातील तनिष्का सदस्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने सुमारे ७ लाखांहून अधिक सीडबॉल तयार केले. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शाळांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. सातारा रस्ता, बिबवेवाडी, अप्पर इंदिरा नगर, धनकवडी, कात्रज, दत्तनगर, आंबेगाव, कोंढणपूर रस्ता परिसर, पुरंदर परिसरातील सुमारे ३० हून अधिक शाळा यात सहभागी झाल्या.  

भोर उपविभागीय वनअधिकारी आशा भोंग, वनपरीक्षेत्र अधिकारी ए. आर. लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नसरापूर येथील करंदी गावाच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर हे सीडबॉल उधळण्यात आले. याप्रसंगी नसरापूरचे वनपाल सचिन जाधवर, वनरक्षक नवनाथ पगडे, निखिल भगत यांच्यासह पुणे शहर, भोर, नसरापूर, सासवड परिसरांतील तनिष्का सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karandi Village Seedball Plantation Tanishka Women Rain