कर्नाटक हापूस धोरणांमुळे ‘राजा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

अनुदान, कमी खर्चात जास्त उत्पादन; स्वस्त असल्याने मोठी मागणी
पुणे - उत्पादनासाठी कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान, सोयी-सुविधा आणि उत्पादनही भरपूर असल्याने कोकणच्या तुलनेत कर्नाटक हापूस आंब्याचे भाव कमी आहेत. त्यामुळे चवीबाबत तडजोड करून तुलनेने स्वस्त असणाऱ्या कर्नाटक हापूस आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.

अनुदान, कमी खर्चात जास्त उत्पादन; स्वस्त असल्याने मोठी मागणी
पुणे - उत्पादनासाठी कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान, सोयी-सुविधा आणि उत्पादनही भरपूर असल्याने कोकणच्या तुलनेत कर्नाटक हापूस आंब्याचे भाव कमी आहेत. त्यामुळे चवीबाबत तडजोड करून तुलनेने स्वस्त असणाऱ्या कर्नाटक हापूस आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.

आंब्याचा हंगाम बहरात आला असून, सध्या शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंबाविक्री सुरू आहे. यामध्ये हापूस आंब्याचे प्रमाण मोठे असून, त्यात कोकणातील हापूस आंब्याचे भाव हे कर्नाटक हापूस आंब्याच्या तुलनेत जास्त आहेत. कोकण महाराष्ट्रात असूनही त्याचे भाव कर्नाटकपेक्षा अधिक का? असा प्रश्‍न अनेकांना पडत आहे. याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता, उत्पादनाचे प्रमाण आणि खर्चाचा विचार केल्यास कर्नाटक हापूस प्रत्यक्षात ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी कमी खर्च येतो, असे स्पष्ट केले. 

कर्नाटक हापूस आंब्याचे विक्रेते रोहन उरसळ म्हणाले, ‘‘देशात हापूस आंब्याच्या उत्पादनात कर्नाटकने बाजी मारली आहे. आपल्या राज्यात केवळ कोकणात हापूसचे उत्पादन होते. त्याउलट कर्नाटकमध्ये संपूर्ण राज्यात हापूसचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे स्वाभाविकपणे तेथील उत्पादन मोठ्या प्रमाणावर निघते. ज्या वेळी उत्पादन जास्त असते, त्या वेळी भाव कमी असतात हे व्यवसायाचे गणितच आहे.’’

व्यापारी युवराज काची यांनी कर्नाटकातील शेतकऱ्यांना तेथील राज्य सरकारकडून चांगले अनुदान दिले जात असल्याकडे लक्ष वेधले. तेथील एक पेटी तयार करण्यासाठी येणारा खर्च आणि आपल्याकडील शेतकऱ्याला एक पेटी तयार करण्यासाठी येणारा खर्च यात तफावत आहे. तेथे मालवाहतुकीसाठी मोठी वाहने उपलब्ध होतात, आपल्याकडे छोट्या वाहनातूनच आंब्याची वाहतूक करावी लागते. त्यामुळे अतिरिक्त खर्च वाढतो. प्रत्यक्षात आंब्याच्या उत्पादनाचे प्रमाण आपल्याकडे स्थिर असले तरी कर्नाटकात ते वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोकणचा हापूस आणि कर्नाटक हापूस यांच्या चवीत तुलना होऊ शकत नाही. कोकणातील उत्पादन क्षेत्रातील भौगोलिक रचना आणि कर्नाटकातील भौगोलिक रचना यात फरक आहे. कोकणात डोंगराळ भागात उत्पादन होते, तर कर्नाटकात मैदानी पट्ट्यात त्याच्या बागा आहेत. तेथील बाजारपेठांत किलोच्या भावांत शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला जातो. मग तो डझनावर विकला जातो. आपल्याकडे शेतकरी किलोवर माल विकत नाही. इतर खर्चही आपल्याकडे जास्त आहेत.
- शिवलाल भोसले, कोकण हापूस आंब्याचे विक्रेते

Web Title: karnataka hapus mango king