कर्वेनगर उड्डाण पुलासाठी दीड महिना प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

दोन्ही बाजूंनी पुलाची वाहतूक पावसाळ्याच्या सुरवातीला सुरू होण्याचे महापौरांना आश्‍वासन

कोथरूड - कर्वेनगर येथील उड्डाण पुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले असून, पुलाच्या एका बाजूची वाहतूक सुरू होण्यास या भागातील नागरिकांना आणखी दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. दोन्ही बाजूंनी पुलाची वाहतूक पावसाळ्याच्या सुरवातीला सुरू होण्याचे आश्‍वासन महापौर मुक्ता टिळक यांना आयुक्त कुणालकुमार यांनी दिले.

दोन्ही बाजूंनी पुलाची वाहतूक पावसाळ्याच्या सुरवातीला सुरू होण्याचे महापौरांना आश्‍वासन

कोथरूड - कर्वेनगर येथील उड्डाण पुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले असून, पुलाच्या एका बाजूची वाहतूक सुरू होण्यास या भागातील नागरिकांना आणखी दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. दोन्ही बाजूंनी पुलाची वाहतूक पावसाळ्याच्या सुरवातीला सुरू होण्याचे आश्‍वासन महापौर मुक्ता टिळक यांना आयुक्त कुणालकुमार यांनी दिले.

कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या उड्डाण पुलाचे नियोजन करण्यात आले; मात्र ठेकेदाराच्या कामाची गती संथ असल्याने काम रखडले. त्यामुळे गेल्या चार वर्षांत या भागातील नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. याला पर्यायी मार्ग नसल्याने वाहनचालकांना या कोंडीत अडकण्याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही. या ठेकेदाराचे काम काढून घेण्याची मागणी नवनिर्वाचित नगरसेवकांनी महापालिकेकडे केली होती. 

स्थानिक नगरसेवक सुशील मेंगडे, राजेश बराटे, वृषाली चौधरी यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांना पुलासह या भागातील अन्य प्रकल्पांची कामे, तसेच परिसरातील अडचणी पाहण्यासाठी बोलावले. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे भेट दिली. या नगरसेवकांबरोबरच या भागातील नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सायली वांजळे, सचिन बोडके, माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, महापालिकेचे अधिकारी श्रीनिवास बोनाला, व्ही. जी. कुलकर्णी, राजेंद्र राऊत, विजय शिंदे, गणेश सोनुणे आदी या वेळी उपस्थित होते.

वारजे पुलाचे काम रखडल्याबद्दल काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत पुलाच्या दोन्ही बाजू लवकर पूर्ण करून एकाच वेळी त्यावरून वाहतूक सुरू करण्याची सूचना केली; मात्र एका बाजूचा पूल पूर्ण झाल्यावर त्यावरील वाहतूक सुरू केल्यास रस्त्यावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल, असे बोनाला यांनी सांगितले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्याची सूचना महापौरांनी केली. 

कुणालकुमार म्हणाले, ‘‘पंधरा मेपर्यंत पुलाची एक बाजू, तर पंधरा जूनपर्यंत दुसरी बाजू पूर्ण करावी. त्यावर ठेकेदारांनी दोन-अडीच महिन्यांत सर्व काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.’’
 
कोंडीतून होणार सुटका
या पुलाचा वारजेकडून कर्वे रस्त्याकडे येणारा भाग पहिल्यांदा खुला करण्यात येणार आहे. त्यानंतर कर्वेनगरकडून वारजेकडे जाणाऱ्या पुलाच्या दुसऱ्या भागाचे काम पूर्ण केले जाईल. वारजे, उत्तमनगर या परिसरातून पुण्यात येणाऱ्या वाहनचालकांची या पुलामुळे वाहतूक कोंडीतून थोडी सुटका होणार आहे. हा एक्‍स आकाराचा पूल असून, रॅम्प चढून गेल्यानंतर पुलाचा मधला भाग दोन्ही बाजूंच्या वाहनचालकांसाठी सामाईक राहणार आहे. 

सात स्लॅबचे काम बाकी
मुंबईतील सिम्प्लेक्‍स इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड या कंपनीची ४१.३७ कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीने फेब्रुवारी २०१२ मध्ये मंजूर केली. पूल बांधण्यासाठी तीस महिन्यांची मुदत दिली असली, तरी प्रत्यक्ष कामाला ऑगस्ट २०१३ मध्ये सुरवात झाली. कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडल्याने काम रेंगाळले. पुलाच्या २२ स्लॅबपैकी सात स्लॅबचे काम अद्याप व्हायचे आहे.

पुलाची माहिती

४१.३७ कोटी रुपये खर्च

५५० मीटर लांबी 

१५ मीटर रुंदी

Web Title: karvenagar over bridge 1.5 month wait