
Kasaba by poll Election : कसब्याच्या पोटनिवडणुकीत माजी सैनिकांची एंट्री, एकत्र येत दाखल केली उमेदवारी
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं दिसून येत आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. याठीकाणी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, कसब्याच्या पोटनिवडणुकीत माजी सैनिकांनी एन्ट्री केली आहे.
माजी सैनिकांनी एकत्र येत उमेदवारी दाखल केली आहे. सैनिक सेना समाज पार्टी कडून पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आला आहे. शिरूर मधून आलेल्या सगळ्या माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या पार्टी मधून तुकाराम डफळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
आमच्या सारख्या सैनिकांवर कुठला ही डाग नाही आणि असे उमेदवार विधानसभेत हवेत ही भूमिका माजी सैनिकांनी मांडली आहे. यावेळी दोन्ही पायाने अपंग असून सुद्धा या पार्टी मधील आलेल्या एका माजी सैनिकाने मात्र अर्ज भरताना सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
निवडणुकीकरिता भाजपकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीकरिता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.