
Kasaba By Polls : "पक्ष इथून पुढे..."; कसब्यातल्या पराभवानंतर हेमंत रासनेंची प्रतिक्रिया
पुण्यातल्या कसबा पोटनिवडणुकीची लढत राज्यभरात चर्चेचा विषय ठरली. भाजपाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कसब्यामध्ये काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडून आले आणि भाजपाला धक्का बसला. भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी या पराभवाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
'सकाळ'शी बोलताना हेमंत रासने म्हणाले, "कोणीही चुकीचं काम केलं नाही. सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं. नैतिकदृष्ट्या मी पराभव माझा वैयक्तिकरित्या मान्य केलेला आहे. तिन्ही पक्षांचे एकत्रित मत धंगेकरांना मिळाल्यामुळे त्यांचा विजय झाला. मी माझ्या पूर्ण प्रचारामध्ये माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका केली नाही माझ्या कामाने मी मत मागितली."
धंगेकरांवर टीका करताना रासने पुढे म्हणाले, "हिरवा गुलाल उधळण्याची परंपरा कसब्यामध्ये कधीही नव्हती. आपल्याकडे केवळ केशरी गुलाल उधळला जातो. हिरवा गुलाल उधळण्याची ही विकृती आहे. 2024 ची निवडणूक व महापालिका निवडणूक लढवण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. पक्ष इथून पुढे जे जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडणार आहे."