मतमोजणीमुळे कोरेगाव पार्क भागात आजपासून वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vote-Counting

कोरेगाव पार्क भागात मतमोजणीमुळे बुधवारी (ता.१) सकाळी ११ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी गुरुवारी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात येणार आहे.

Kasaba Election Result : मतमोजणीमुळे कोरेगाव पार्क भागात आजपासून वाहतुकीत बदल

पुणे - कोरेगाव पार्क भागात मतमोजणीमुळे बुधवारी (ता.१) सकाळी ११ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी गुरुवारी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, , अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

कोरेगाव पार्क भागातील सेंट मीरा कॉलेज आणि अतुर पार्क सोसायटीकडून साऊथ मेन रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना गल्ली क्रमांक एकपर्यंत प्रवेश देण्यात येईल. गल्ली क्रमांक एक येथून वाहनचालकांनी डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. या ठिकाणी बॅरिकेड॒स उभारण्यात येणार आहेत. साऊथ मेन रस्त्यावरील गल्ली क्रमांक पाच, सहा आणि सातकडून साऊथ मेन रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना गल्ली क्रमांक चारपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. गल्ली क्रमांक चार येथून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

आवश्यकतेनुसार सेंट मीरा कॉलेजसमोर, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यासमोर आणि साऊथ मेन रस्त्यावर गल्ली क्रमांक पाच येथे बॅरिकेड॒स उभे करण्यात येतील. साऊथ मेन रस्त्यावरील गल्ली क्रमांक दोन येथे प्लॉट क्रमांक ३८, जैन प्रॉपर्टीसमोर बॅरिकेड॒स उभारण्यात येणार आहेत. तेथून सर्व वाहनांना साऊथ मेन रस्त्याकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

दरोडे पथ (कोरेगाव पार्क पोलिस ठाणे) ते गल्ली क्रमांक पाच साऊथ मेन रस्त्यावर दोन्ही बाजूस बुधवारी सकाळी ११ वाजल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहने लावण्यास मनाई (नो व्हेइकल झोन) करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहन पार्किंगसाठी ठिकाण -

मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित अधिकारी-कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि नागरिकांना वाहन पार्किंगची व्यवस्था गाडगे महाराज शाळेच्या आवारात करण्यात आली आहे.