कासारवाडी ग्रेडसेपरेटरमधील रस्ता खुला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

मेट्रोच्या कामामुळे अनेक दिवसांपासून बंद असणारा कासारवाडी ते खराळवाडी दरम्यानचा ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

पिंपरी - मेट्रोच्या कामामुळे अनेक दिवसांपासून बंद असणारा कासारवाडी ते खराळवाडी दरम्यानचा ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. 

ग्रेडसेपरेटरलगत असणाऱ्या दुभाजकाजवळ मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम सुरू होते. त्यामुळे अपघात होऊ नये, म्हणून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. पिलरच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून, अनेक ठिकाणी गर्डर बसविण्याचेही काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रोने या रस्त्यावरील वाहतूक सेवा पूर्ववत केली आहे. 

आतापर्यंत ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवल्यामुळे कासारवाडी ते खराळवाडीदरम्यानच्या सेवा रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला होता. तसेच कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ प्रवासी घेण्यासाठी थांबणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बस, रिक्षाचालकांमुळे कोंडीत भर पडायची. 
कासारवाडी चौकातील सेवा रस्त्यावर मेट्रोच्या पिलर उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक विस्कळित झाली आहे. सेवा रस्त्यावरून येणारी वाहने भोसरीकडे वळण्यासाठी सिग्नलला थांबतात.

ग्रेडसेपरेटरमधून येणारी वाहने त्याच ठिकाणी येतात. त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहनांना वळताना अडचण होते. वाहतूक पोलिस आणि मेट्रो यांनी समन्वय साधून चौकातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी उपाययोजना केल्यास चौकातील समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

‘‘मेट्रोच्या कामामुळे दापोडी ते पिंपरीदरम्यानच्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. खासगी ट्रॅव्हल थांबत असल्याने संध्याकाळी इथे कायम कोंडी होते. सेवा रस्त्यावर वाहनांच्या पार्किंगची समस्या असून, त्यामुळे हा रस्ता अरुंद होत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे चिंचवड येथील श्रीराम भोसले यांचे म्हणणे आहे. 

Web Title: Kasarwadi grade separator Road Open