वाहतूक काेंडीत कासारवाडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

पिंपरी - रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांची गर्दी, मेट्रोच्या कामासाठी करण्यात आलेले बॅरिकेडिंग आणि रस्त्यांवर पडलेले खड्‌डे, अशा विविध कारणांमुळे कासारवाडीतील सेवारस्ता सध्या अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे येथील समस्यांमध्ये सातत्याने भर पडताना दिसत आहे. 

रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी; अन्यथा हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावा, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे. 

कासारवाडी परिसरात मेट्रोच्या कामाला सुरवात झाली आहे. त्यामुळे दीड किलोमीटर पट्ट्यात बॅरिकेड लावण्यात आले आहेत. याच ठिकाणी रेल्वे स्थानक असून, स्थानकाबाहेर रिक्षाचालक थांबलेले असतात. कासारवाडी चौकातील सिग्नल सुटल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याच रस्त्यावर गाड्या दुरुस्तीची अनेक दुकाने आहेत. त्यांच्याकडे येणारी वाहने रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे सेवारस्त्याने पिंपरीकडे जाणाऱ्यांना येथे अडथळा येतो. 

सेवारस्त्यालगतच मेट्रोचे काम सुरू झाले असून, त्याची यंत्रसामग्री येथे ठेवण्यात आली आहे. तसेच, कामाच्या ठिकाणाची माती सर्वत्र पसरत आहे. पावसामुळे या अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना आहे.

कासारवाडी बीआरटी मार्गाजवळील सेवारस्त्याच्या दुरुस्तीचे काम पाऊस थांबल्यानंतर हाती घेण्यात येईल. सध्या निगडी ते दापोडीदरम्यानच्या खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. 
-विजय भोजने, प्रवक्‍ते, बीआरटी 

सेवारस्त्याबरोबरच अन्यत्र अनधिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांवर सातत्याने कारवाई करण्यात येते. सध्या वाहतूक पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने कारवाईचा वेग कमी आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. 
-अरुण ओंबासे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक, भोसरी

नागरिक म्हणतात...
मेट्रोच्या कामामुळे जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर वाहन चालवणे अवघड झाले आहे. कासारवाडी सेवारस्त्यावरील अडचणी वाढल्या आहेत. दिवसभर वाहतूक कोंडी असते. मेट्रो प्रशासन, वाहतूक पोलिस, पालिकेने लक्ष द्यावे. 
- केदार तुंगीकर, चिंचवड

सेवारस्ता धोकादायक झाला आहे. सध्याची स्थिती व समस्यांचा विचार करून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात. 
- गौतम गाला, वाकड

Web Title: kasarwadi in traffic metro work