Sharad Pawar News: कसबा पेठ विधानसभा मतदार संघ भाजपचा नव्हे तर बापटांचा बालेकिल्ला होता; शरद पवार | Pune News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Assembly Constituency belong to Girish Bapat not BJP Sharad Pawar

Sharad Pawar : कसबा पेठ विधानसभा मतदार संघ भाजपचा नव्हे तर बापटांचा बालेकिल्ला होता; शरद पवार

Pune News: "कसबा विधानसभा मतदारसंघ हा कधीही भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला नव्हता हा मतदारसंघ गिरीश बापट यांचा बालेकिल्ला होता", असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी येथे केले.

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी पवार यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी सकाळी दहाच्या सुमारास भेट घेतली. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी धंगेकर यांच्या समवेत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, "कसबा पोटनिवडणुकीत यश मिळेल असे आम्हाला सामान्यांमधून ऐकण्यात मिळत होते. पण मला याची खात्री नव्हती. त्याचे मुख्य कारण नारायण, सदाशिव, शनिवार पेठ हे होते.

हा सर्व भाग भाजपचा गड आहे असे अनेक वर्षे बोलले जाते. तसेच याठिकाणी बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनीधित्व केले होते. बापट यांचे वैशिष्ट्य असे की भाजपची विचारधारा न मानणारा जो पुण्यातील वर्ग आहे त्या सर्वांशी बापट यांनी मैत्रीचे संबंध ठेवले आहेत.

त्यामुळे बापट यांचे लक्ष ज्याठिकाणी अधिक केंद्रीत आहे तो मतदारसंघ आपल्याला जड जाईल असा अंदाज आमचा होता. परंतु शेवटी साधारण एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या सल्ल्यांनी निर्णय घेतला गेला नाही, अशी कुजबूज ऐकायला मिळाली.

याचा अर्थ बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतल्यास त्याचे काय परिणाम होतील अशी चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल अशी शंका होतीच. परंतु निवडणूक झाल्यावर मी घेतलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिले ती व्यक्ती वर्षानुवर्षे सामान्य लोकांमध्ये कशाचीही अपेक्षा न करता काम करणारी होती.

तसेच हा उमेदवार कधीच चार चाकीत बसत नाही तर दोनचाकीवाला आहे. त्यामुळे दोन पाय असलेल्या मतदारांचे लक्ष यांच्याकडे आहे. तसेच पक्षाचा पाठींबा, महाविकास आघाडीतील सर्व घटक याठिकाणी मनापासून राबले याचा हा परिणाम आहे असे आमचे निरीक्षण आहे."

महाराष्ट्रात लोकांना बदल हवाय. त्यामुळे उद्याची विधानसभा आणि लोकसभेसंदर्भात महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील लोकांना एकत्रित ठेवून एकत्रित निर्णय घेणे हा माझा एक प्रयत्न राहणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी कसबा निवडणुकीत ज्यांचा विजय झाला ते उमेदवार महाविकास आघाडीचे होते हे तरी मान्य केले.

निवडणुकीपूर्वी त्यांची वक्तव्य काय होती ते वाचनात आले होते त्यामध्ये आता थोडा गुणात्मक बदल आहे. कमीत कमी निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल ते चांगले बोलतात ही चांगली गोष्ट आहे, असेही पवार यांनी सांगितले.

या निवडणुकीत भाजपने वाटलेले पैसे आणि केलेले गैरप्रकार हे पारंपारिक मतदारांना अजिबात आवडलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

शेतकरी योग्य वेळी निर्णय घेतील

नाशिकच्या मनमाडच्या शेतकऱ्यांनी माझ्याशी बोलणे केले त्यामध्ये कांदा खरेदी योग्य पद्धतीने सुरू नाही. कांद्याचे पडलेले भाव सावरण्याच्या दृष्टीने काळजी घेतली जात नाही.

राज्य आणि केंद्र सरकारने जे निर्णय घेतले ते योग्य नाहीत अशी तक्रार शेतकऱ्यांची आहे. ज्याअर्थी अजूनही भावात सुधारणा होत नाही, याचे दुख शेतकऱ्यांमध्ये आहे. त्याची किंमत शेतकरी योग्य वेळी वसूल करतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.