Kasba By Election : आजी माजी आमदारांवर प्रभागाची जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba By Election

Kasba By Election : आजी माजी आमदारांवर प्रभागाची जबाबदारी

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपने या मतदारसंघात एक प्रभाग एक आमदार किंवा माजी आमदार अशी रचना लावली आहे. तसेच बूथ यंत्रणा, प्रचार यंत्रणा उभारण्याची जबाबदारी यांच्याकडे देण्यात आली आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उद्याने, गणेश मंडळ या ठिकाणी जाऊन गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपने मतदान केंद्राचे मायक्रो प्लॅनिंग करण्यासाठी माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली.

यामध्ये आजी-माजी आमदारांकडे जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. प्रभाग क्रमांक १५ सदाशिव, नारायण पेठची जबाबदारी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे आहे. प्रभाग क्रमांक १६ कसबा पंपिंग स्टेशनची आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रभाग क्रमांक १७ रास्ता पेठमध्ये माजी आमदार योगेश टिळेकर, प्रभाग क्रमांक १८ महात्मा फुले मंडई - खडकमाळ आळी येथे माजी आमदार बापूसाहेब पठारे, प्रभाग क्रमांक १९ कासेवाडी-लोहियानगर येथे आमदार सुनील कांबळे काम पाहणार आहेत.

तर प्रभाग क्रमांक २९ दत्तवाडी-नवी पेठची जबाबदारी आमदार भीमराव तापकीर यांच्याकडे आहे, अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. तर ७४ शक्ती केंद्रासाठी एक माजी नगरसेवक व एक पदाधिकारी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे, असेही मुळीक यांनी सांगितले.

घाटेंनी घेतली फडणवीसांची भेट

कसब्यातील इच्छुक माजी सभागृहनेते धीरज घाटे यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. निवडणुकीसाठी केलेली तयारी, मतदारसंघातील परिस्थिती याची माहिती दिली. त्यावर फडणवीस यांनी यावेळी संधी मिळाली नसली तरी भविष्यात पक्षाकडून चांगली संधी मिळेल, असे सांगितले असल्याचे घाटे यांना सांगितले.