Kasba By Election : ब्राह्मण समाजाची नाराजी फ्लेक्समधून व्यक्त | Kasba By Election bjp displeasure of Brahmin community pune politics congress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba By Election bjp displeasure of Brahmin community pune politics congress

Kasba By Election : ब्राह्मण समाजाची नाराजी फ्लेक्समधून व्यक्त

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपने ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याने भाजपविरोधात झालेल्या फ्लेक्सबाजीमुळे खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमध्येही ब्राह्मण पदाधिकारी इच्छुक असताना त्यांचाही विचार न झाल्याने त्यांच्यातीलही नाराजी समोर आली आहे. तर या नाराजीमुळे हिंदू महासंघातर्फे आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने पोटनिवडणुकीत त्यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी दिली जाईल असा अंदाज लावला जात होता. पण पक्षाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ब्राह्मण समाजाचे उमेदवार डावलले असल्याची चर्चा सुरू झाली.

त्याच पार्श्‍वभूमीवर ‘कुलकर्णींचा मतदार संघ गेला... टिळकांचा मतदारसंघ गेला... आता नंबर बापटांचा का? .. समाज कुठवर सहन करणार’ असा निनावी फ्लेक्स पेठेत लावण्यात आल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, यावर शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांनी खुलासा करत आम्ही उमेदवारी मागितली होती, पण आता हेमंत रासने यांच्या पाठीशी उभे आहोत, मोठा विजय मिळवू असे स्पष्ट केले आहे.

कसबा मतदारसंघातील पेठांमध्ये भाजपचा प्रभाव असताना येथे आम्ही काँग्रेस पक्षाचे इमानेइतबारे काम करत आहोत. तरीही आमच्या नावाऐवजी इतरांचा विचार केला जात आहे. पक्षाने आम्हाला संधी द्यायला पाहिजे होती.

असे सांगत काँग्रेसमधील इच्छुकांनीही काँग्रेसमध्ये ब्राह्मणांना डावलले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत तो पक्षात योग्य ठिकाणी मांडू असे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ब्राह्मण समाजाचे नेतृत्व नाकारले जात असल्याने हिंदू महासंघातर्फे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे आनंद दवे यांनी सांगितले. त्यांनी आज शैलेश टिळक यांचीही भेट घेतली.