Kasba By-election : शक्तिप्रदर्शन करीत हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल Kasba By-election Hemant Rasane application candidature filed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

Kasba By-election : शक्तिप्रदर्शन करीत हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : जोरदार घोषणाबाजी, महिलांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, वाद्यांची आतषबाजी अशा वातावरणात शक्तिप्रदर्शन करीत भारतीय जनता पक्ष - बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आणि महासंग्राम युतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला.

शहरातील मानाचा पहिल्या कसबा गणपतीची आरती करून रासने यांनी अर्ज दाखल केला. त्यासाठी सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच कसबा गणपतीजवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष जगदिश मुळीक,

माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस राजेश पांडे तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे पुणे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, शहर प्रमुख नाना भानगिरे, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, शहर महिला आघाडी लीनाताई पानसरे युवासेना शहर प्रमुख निलेश गिरमे, ‘आरपीआय’चे परशुराम वाडेकर, सुनीता वाडेकर, मंदार जोशी तसेच शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते तेथे उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप आणि युतीचे कार्यकर्ते, तसेच माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. कसबा गणपतीची आरती झाल्यावर रासने आणि नेते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गपतीच्या दर्शनाला गेले. तेथे फटाक्यांच्या आतषबाजीत रासने यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर रासने नेत्यांसमवेत भरण्यासाठी रवाना झाले. अनेक कार्यकर्तेही त्यांच्यासमवेत तेथे गेले होते.

शक्तिनिशी निवडणूक लढविणार

या प्रसंगी बावनकुळे यांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्याचे कोठवर आले, अशी विचारणा केली असता, त्यांनी पोटनिडणूक ही बिनविरोध करण्याचा आमची तयारी आहे. त्यासाठी हवा असल्यास उमेदवार बदलण्याची आमची तयारी आहे.

परंतु, महाविकास आघाडी त्यांच्या शब्दाचे पालन करीत नाही, असा आमचा आजवरचा अनुभव आहे.’’ भाजपने विरोधकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्यात गोंधळ आहे. त्यामुळे पूर्ण शक्तिनीशी आम्ही ही निवडणूक लढवून आमचा उमेदवार निवडून आणणार आहोत, असे पालकमंत्री पाटील यांनी नमूद केले.

शैलेश टिळक अनुपस्थित

रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप आणि युतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. परंतु, मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक मात्र, अनुपस्थित होते. त्यांची उपस्थिती पक्षाला अपेक्षित होती, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. शैलेश टिळक यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आहे. तरीही ते नाराज असतील, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणखी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांची समयसूचकता

भाजप युतीचे उमेदवार कसबा गणपतीची सकाळ साडेनऊ वाजता आरती करणार, असे जाहीर करण्यात आले होते. तर महाविकास आघाडीने सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी आरती करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

त्यामुळे कसबा गणपतीजवळ दोन्ही पक्ष समोरासमोर येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी दोन्ही पक्षांना सामोपचाराने घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे साडेदहाच्या सुमारास रासने रवाना झाल्यावर त्यानंतर कसबा गणपतीसमोर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आले.

- हेमंत रासने (भाजप युती) ः गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून भाजपचं काम करीत आहे. आमदारकीची संधी आत्ता मिळाली आहे. गेल्या वेळेस उमेदवारी मागितली होती परंतु मुक्ता टिळक यांना पक्षाने उमेदवारी दिल्यावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. भाजपमध्ये नाराजीची भाषा चालत नाही. हा शिस्तबद्ध पक्ष आहे. विरोधात कोणीही असो कसाही प्रचार करो. भाजप आणि मित्र पक्षांच्या बळावर विजय मिळवणारच

- रवींद्र धंगेकर (महाविकास आघाडी) ः गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात आहे. लोकांची कामे करणारा कार्यकर्ता म्हणून मी कसब्यात परिचित आहे. घराघरातून मला पाठिंबा मिळत आहे. मुक्ता टिळक यांची राहिलेली कामे पूर्ण करणार आहे. आमच्या महाविकास आघाडीच्या जोरावर यंदा कसब्यातून माझ्या विजय नक्की आहे. त्यासाठी शेकडो कार्यकर्ते जिवाचे रान करतील.