Kasba Bypoll Election : विजयी मिरवणूक काढण्यास मनाई; पोलिसांकडून कडक बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kasba bypoll election result Prohibition processions Strict security police politics

Kasba Bypoll Election : विजयी मिरवणूक काढण्यास मनाई; पोलिसांकडून कडक बंदोबस्त

पुणे : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कोरेगाव पार्क भागातील अन्नधान्य महामंडळाचे गोदाम तसेच शहरातील मध्यभागात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

तसेच निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. अन्नधान्य महामंडळाचे गोदाम आणि मध्यभागातील कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियानगर, कासेवाडी भागात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

यासह संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके मध्यभागात गुरुवारी गस्त घालणार आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार, कर्णिक यांनी बुधवारी (ता. १) पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.

दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात वेळेत पोचता यावे. तसेच कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात देखील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

सोशल मीडियावर पोलिसांचा ‘वॉच’

मतमोजणी सुरू असताना आणि निकालानंतर सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या आक्षेपार्ह मजकुरावर पोलिसांचा वॉच असणार आहे. गैरप्रकार तसेच आक्षेपार्ह मेसेज प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.