परसेप्शन ते फसलेला प्रयोग, कसब्याचा गड भाजपाने या कारणांमुळे गमावला | Pune Kasba Peth Bypoll Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Kasba Peth Bypoll Election

Kasba Bypoll Result: परसेप्शन ते फसलेला प्रयोग, कसब्याचा गड भाजपाने या कारणांमुळे गमावला

Pune Kasba Peth Bypoll Result Analysis in Marathi

पराभव समोर दिसू लागला की हिंदुत्वाच्या भावनिक मुद्द्याला हात घालायचा, हा भाजपचा प्रयोग या पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात यशस्वी झाला नाही. उमेदवार ताकदीचा असेल आणि सर्व घटक पक्षांनी मनापासून काम केले तर भाजपचा पराभव होऊ शकतो, हा मोठा आत्मविश्वास देणारी ही पोटनिवडणूक ठरली. पुण्यात पुन्हा एकदा काँग्रेस जिवंत करण्याचे काम या निकालाने केले असून, येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला मोठा इशारा देणारा हा निकाल ठरला आहे.

'who is dhandekar'  हे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उच्चारलेले वाक्य प्रचारासाठी ठीक असले तरी धंगेकर यांना पहिल्या दिवसापासून मिळालेला प्रतिसाद भाजपला अस्वस्थ करणारा ठरला. याच कारणामुळे अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे डझनभर मंत्री सर्व ताकदीनिशी प्रचारात उतरले होते. पण यावेळी मतदारांनी निर्णय घेतला होता.

एक काम करणारा सामान्य उमेदवार विरुद्ध सर्व प्रकारची ताकद असणारे सत्ताधारी अशीच या लढतीचे चित्र राहिले. हे 'परसेप्शन' बदलण्याऐवजी ते अधिक घट्ट करण्याचे काम भाजपच्या काही कृतीतून झाले. निवडणूक म्हटले की पैशाचा धूर असेच वातावरण राजकीय पक्ष तयार करतात. धंगेकर यांनी नेमका हाच मुद्दा कॅच करत आपली लढाई धनशक्ती विरोधात असल्याचा मुद्दा सतत पेटवत ठेवला. हा मुद्दा भाजपला शेवटपर्यंत नीट खोडता आला नाही.

१. धंगेकर विरुद्ध भाजप अशी लढत

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची ही तिसरी निवडणूक. २००९ मध्ये धंगेकर यांचा गिरीश बापट यांच्याकडून अवघ्या आठ हजारांनी पराभव झाला होता. २०१४  मध्ये मनसेत असताना धंगेकर तिसऱ्या स्थानावर होते. त्यानंतर धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये धंगेकर यांच्याऐवजी अरविंद शिंदे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. मात्र तेव्हा काँग्रेसचा मोठा पराभव झाला. धंगेकर यांनी मात्र नगरसेवक म्हणून आपले काम नेटाने केले.

कोरोना काळात त्यांनी केलेली मदत त्यांची इमेज सर्वसामान्यांसाठी रात्री हाक दिली तरी मदतीला धावून येणारा कार्यकर्ता अशी झाली. त्याचा परिणाम धंगेकर यांच्याविषयी पहिल्या दिवसापासून सहानुभूती राहिली. सदाशिव, शनिवार, नारायण या भाजपच्या कट्टर समजल्या जाणाऱ्या प्रभागांमध्ये हेमंत रासने यांना केवळ साडेसहा हजार मतांचीच आघाडी मिळाली, तेथेच धंगेकरांचा विजय झाला. धंगेकर यांना आघाडीतील तीनही पक्षांचे बळ मिळाले ही वस्तुस्थिती असली तरी धंगेकर यांचे स्वतः चे असे कार्यकर्त्यांचे मोहोळ होते. प्रचारात ते वेळोवेळी जाणवले.

धंगेकर यांच्यामुळे काँग्रेसला कधी नव्हे एवढे बळ आले, भाजपला मात्र स्वतः विषयीचा फाजील आत्मविश्वास नडला. एवढी मोठी यंत्रणा, नगरसेवक, पक्ष संघटनेचे विस्तृत जाळे, संघाची शिस्तबद्ध यंत्रणा असताना भाजप मतदार संघात विजयाचे वातावरण तयार करू शकली नाही.

२. भाजपविरोधातील राग

कसब्याच्या विजयात एक बाब सर्वात महत्त्वाची ठरली ती म्हणजे महाविकास आघाडीतील एकजूट. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेल्याने मूळ शिवसैनिकांमध्ये असंतोष होता. त्यांना भाजपला धड शिकवायचा होता. कसब्यात मूळ शिवसैनिकांची ताकद आहे. आदित्य ठाकरे यांची रॅली आणि सभेला जो प्रतिसाद मिळाला त्यावरुनच डिवचलेला शिवसैनिक कामाला लागल्याचे स्पष्ट झाले. या पक्षाचे कार्यकर्ते जोमाने धंगेकर यांच्या प्रचारात उतरले. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रामाणिकपणे काम करीत धंगेकर यांना साथ दिली. अजित पवार आणि स्वतः शरद पवार यांच्या सभा धंगेकरांच्या विजयाचा पाया रचत गेल्या.

आतापर्यंत २००९ पासूनच्या निवडणुकीत कसब्यात भाजपला मतविभागणीचा फायदा झाला आहे. २००९ आणि २०१४ मध्ये धंगेकर आणि रोहित टिळक यांच्यात झालेल्या मतविभागणीत बापट विजयी झाले. २०१९ मध्येही मतविभागणीचा फायदा भाजपला झाला होता. या पोटनिवडणुकीत थेट लढत झाली आणि भाजपचा पराभव झाला. महाविकास आघाडी एकत्र राहिली तर भाजपचा पराभव करु शकतो हा संदेश मिळाला. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधातील हा प्रयोग राबविला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

3. मुद्द्यांनाच अधिक महत्त्व!

सुज्ञ मतदार भावनांना नाही तर मुद्द्यांना महत्त्व देतात हा संदेश मतदारांनी पुन्हा एकदा दिला. भाजपची पुण्यात विशेषतः कसब्यात सत्ता असतानाही अनेक प्रश्न दुर्लक्षित राहिले. वाड्यांचे पुनर्वसन, वाहतूक कोंडी, व्यापारी वर्गाचे प्रश्न, पाणी याकडे दुर्लक्ष झाले. भाजपने निवडणुकीत या प्रश्नावर न बोलता पुणेश्वरापासून हिंदुत्वाचे मुद्दे उपस्थित केले, मतदारांचा त्यावर प्रभाव पडला नाही. काम करणारा उमेदवार म्हणून धंगेकर यांचा पसंतीक्रम उंचावत राहिला.

३२ वर्षांनंतर कसब्यात झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा आहे. पक्षसंघटनेपासून निवडणूक व्यूहरचनेपर्यंत अनेक बाबीत पक्षाला चिंता आणि चिंतन करावे लागणार आहे. काँग्रेसचा या विजयानंतर वाढलेला आत्मविश्वास हा त्यांच्यासाठी बदलाची नांदी देणारा ठरेल हे नक्की.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला इशारा

या निवडणुकीतील विजयाने पुण्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खातेही उघडू न शकणाऱ्या काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत तीन लाखांच्या फरकाने पराभव झाला. त्यानंतरच्या विधानसभा, महापालिका निवडणुकीतही या पक्षाचा प्रभाव कमी झाला होता. या विजयाने काँग्रेसच्या पराभवाचे ग्रहण सुटले असे म्हणता येईल. आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी राहिली तर सोपी नसेल हा संदेश या निकालाने दिला. ब्राह्मण समाजाला गृहीत धरून चालणार नाही, याची चुणूक ही मिळाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी वडगावशेरी आणि आता कसबा हे दोन मतदारसंघ भाजपच्या हातून निसटले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाचा असणारा हडपसर मतदारसंघातही भाजपच्या ताब्यात नाही. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीतही भाजपचा कस लागणार आहे.